नवी दिल्ली : सरोगसी प्रकरणात मृत व्यक्तीचे शुक्राणू (स्पर्म) वापरण्याची परवानगी उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिली. सर गंगाराम रुग्णालयात एका मृत व्यक्तीचे गोठविलेले स्पर्म ठेवण्यात आले होते. हायकोर्टाने मृत व्यक्तीचे फ्रीज केलेले स्पर्म सरोगसीच्या माध्यमातून मूल जन्माला घालण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना सोपवण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायाधीश प्रतिभा सिंह यांनी यासंबंधीचा निर्णय दिला. न्यायालयाने म्हटले की, जर स्पर्मचा वापर करण्यास मालकाची परवानगी मिळाली तर त्याच्या मृत्यूनंतरदेखील मूल जन्माला घालण्यास कोणतेही बंधन नाही. भारतीय कायद्याअंतर्गत जर स्पर्मबाबत सहमतीचे पुरावे सादर करण्यात आले तर त्याच्या मृत्यूनंतरदेखील प्रजनन करण्यास कुठलेही बंधन घालण्यात आलेले नाही. मृत्यूनंतर प्रजननातून संबंधित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे की नाही, याचा निर्णय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय घेऊ शकते. प्रीत इदर सिंह यांचा १ डिसेंबर २०२० रोजी मृत्यू झाला. त्याच वर्षी २१ डिसेंबर रोजी त्यांचे आई-वडील गुरविंदर सिंह आणि हरबीर कौर यांनी रुग्णालयात सुरक्षित स्पर्म जारी करण्याची विनंती केली होती. जेव्हा त्यांना सॅम्पल मिळू शकले नाही तेव्हा त्यांनी २०२१ मध्ये दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. त्यांच्या कुटुंबाला वारस मिळण्यासाठी या दाम्पत्याने मुलाचे स्पर्म फ्रीजमध्ये ठेवले होते.
न्यायाधीश सिंह यांच्या खंडपीठाने प्रीत यांच्या आई-वडिलांची याचिका दाखल करून घेत उपरोक्त निर्देश दिले. प्रीत इंदर यांनी आपले स्पर्म संरक्षित करण्यासाठी परवानगी दिली होती. ते प्रजनन संरक्षणासाठी स्पर्म फ्रीजिंग करण्यासाठी तयार होते. याचिकाकर्त्यांच्या मुलाचा उद्देश मूल जन्माला घालण्यासाठी स्पर्मचे सॅम्पल वापणे हा होता. त्यामुळे कोर्टाने स्पष्ट केले की, आई-वडीलांना आपल्या मुलाच्या अनुपस्थितीत नातवंडांना जन्म देण्याची संधी मिळू शकते, असेही यावेळी न्यायालयाने नमूद केले.