पुणे :
पुणे महापालिकेची सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा असलेल्या हडपसर मतदारसंघात नगरसेविकांची संख्या लक्षणीय ठरणार आहे. या मतदारसंघातून महापालिकेतील सुमारे 25 टक्के नगरसेवक येणार असल्याने, तेथे राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपला परिश्रम करावे लागणार आहेत.
या मतदारसंघात 42 नगरसेवक असून, त्यांच्यापैकी 23 महिला आहेत. मतदारसंघात अनुसूचित जातीसाठीच्या आरक्षित पाच जागांपैकी चार ठिकाणी महिलांसाठी आरक्षण पडले आहे. त्यामुळे गेल्या वेळी निवडून आलेल्या अशोक कांबळे व वीरसेन जगताप यांना या आरक्षित जागेवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नाही. सर्वसाधारण जागांमध्ये 19 जागा महिलांसाठी, तर 18 जागा सर्वांसाठी खुल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातील 32 नगरसेवकांपैकी राष्ट्रवादीचे 17, तर भाजपचे दहा, शिवसेनेचे तीन आणि मनसेचे दोन जण होते. समाविष्ट गावांमुळे येथील नगरसेवकांची संख्या दहाने वाढली. फुरसुंगी, मांजरी, उरुळी देवाची, गुजरवाडी ही गावे वाढली. या नवीन दहा जागांवर कोण बाजी मारणार, ते महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांना निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना यावेळी पुन्हा लढण्याची संधी मिळणार आहे.
हडपसर पट्ट्यातील प्रभाग क्रमांक 22 ते 26 या पाच प्रभागांत नऊ जागा महिलांसाठी, तर एक जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. त्यामध्ये 22 व 23 नवीन प्रभाग आहेत. प्रभाग 24 व 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमलता मगर, पूजा कोद्रे, योगेश ससाणे, वैशाली बनकर, तर प्रभाग 26 मध्ये आनंद अलकुंटे हे इच्छुक आहेत.
कोंढव्यात प्रभाग 41 मध्ये हमिदा सुंडके, गफूर पठाण हे राष्ट्रवादीचे असून, तेथे मनसेचे साईनाथ बाबर हेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग 43 (वानवडी कौसरबाग) मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नंदा लोणकर आहेत. प्रभाग 46 हा पूर्णपणे नवा प्रभाग आहे. प्रभाग 47 (कोंढवा येवलेवाडी) मध्ये गेल्या वेळी भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. तेथे भाजपचा जोर राहण्याची शक्यता आहे. प्रभाग 57 व 58 या कात्रज परिसरातील प्रभागात भाजप व राष्ट्रवादी यांच्यात लढत होईल. गेल्या वेळी त्या भागात राष्ट्रवादीचा जोर होता.