पुणे: पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशनने पत्र पाठवून त्रुटीची पूर्तता न केल्यास मान्यता रद्द का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजाविली असून या महाविद्यालयाला 1 कोटी रुपयांचा दंड का करू नये असा सवालही उपस्थित केला आहे.
पायाभूत सुविधा नसताना हे मेडिकल कॉलेज का सुरू केले ? असा प्रश्न उपस्थित करत या त्रुटी तातडीने प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दूर कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी दिला आहे. (Latest Pune News)
पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाल सुरू करण्यात आले. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार होते. नॅशनल मेडिकल कमिशनने या महाविद्यालयाला मान्यता दिल्यावर काही बाबीची पूर्तता करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र, चार वर्षे होऊनही या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पुरेशा प्रमाणात नाहीत, फॉरेन्सिक विभाग नाही, विद्यार्थ्यांना वसतिगृह नाही. त्यामुळे नॅशनल मेडिकल कमिशनने याची दखल घेत त्रुटींचे पत्र पाठवले असल्याचे धेंडे म्हणाले.
या महाविद्यालयामध्ये जे प्राध्यापक आहेतद्, त्यांनी कमला नेहरू रुग्णालयात काम करणे अपेक्षित आहे. मात्र, हे प्राध्यापक त्या ठिकाणी काम करत नाही, याबाबत कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तक्रारी करूनही या महाविद्यालयाचे अधिष्ठाता त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. या विद्यालयात फॉरेन्सिक विभाग नाही.
परिणामी नाईलाजाने येथील विद्यार्थ्यांना पिंपरी चिंचवड येथे पाठविले जाते. या महाविद्यालयातील आकृतीबंधाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. या वैद्यकीय विद्यालयात पहिल्यांदा प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता शेवटच्या वर्षात असून त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्यास विद्याथ्यार्ंचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने तातडीने या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व त्रुटी पालिका प्रशासानाने दूर कराव्यात, अशी मागणी डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनीकेली आहे.