सासवड: दीर्घकालीन दुष्काळाने त्रस्त असलेल्या पुरंदर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. नद्या, नाले कोरडे पडले होते आणि कडक उन्हाळ्यामुळे पिकांची अवस्था बिकट झाली होती. मात्र, गेल्या 5 दिवसांपासून पडणार्या जोरदार पावसामुळे शिवारात नवचैतन्य संचारले असून, शेतकर्यांमध्ये नवउमेद निर्माण झाली आहे.
पश्चिम पुरंदरमधील गराडे, चांबळी, भिवरी, बोपगाव, नारायणपूर, कोडीत तसेच सासवड व परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. पूर्व भागातील वनपुरी, पारगाव, वाघापूर, टेकवडी, माळशिरस, पिसर्वे, नायगाव, शिवरी आणि दक्षिणेकडील जेजुरी, पांगारे, परिंचे, वीर, मांढर, काळदरी खोर्यातही दमदार पावसाची नोंद झाली आहे. (Latest Pune News)
या पावसामुळे खरीपपूर्व मशागतीला सुरुवात झाली आहे. तसेच पाणीटंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळाला आहे. शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांनाही या पावसाचा मोठा आधार मिळाला आहे.
दि. 22 मे रोजीच्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे : सासवड 45 (मिमी), जेजुरी55 (मिमी), परिंचे 27 (मिमी), वाल्हे 43 (मिमी), कुंभारवळण 29 (मिमी), राजेवाडी 49 (मिमी), भिवडी 48 (मिमी), शिवरी 17 (मिमी).
सध्या सुरू असलेला पाऊस हा पूर्वमोसमी असून, मान्सून अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आत्ताच पेरणीची घाई न करता मशागत पूर्ण करून ठेवावी. मान्सून आल्यानंतर वाफसा स्थितीतच पेरणी करावी तसेच यंदाच्या खरिपासाठी योग्य पिकांची आणि वाणांची निवड विचारपूर्वक करावी.- सूरज जाधव, कृषी अधिकारी, पुरंदर