अ‍ॅक्सिडेंटल आमदाराने कामापेक्षा दंगेच जास्त केले; उपमुख्यमंत्री फडणवीसांची धंगेकरांवर टीका  Pudhari
पुणे

Political News: अ‍ॅक्सिडेंटल आमदाराने कामापेक्षा दंगेच जास्त केले; उपमुख्यमंत्री फडणवीसांची धंगेकरांवर टीका

Maharashtra Politics: 'ज्याप्रकारे ‘अ‍ॅक्सिडेंटल पीएम’ चित्रपट तयार झाला, त्याच पद्धतीने कसबा पेठ पोटनिवडणुकीत एक अ‍ॅक्सिडेंटल आमदार झाला'

पुढारी वृत्तसेवा

Pune: ज्याप्रकारे ‘अ‍ॅक्सिडेंटल पीएम’ चित्रपट तयार झाला, त्याच पद्धतीने कसबा पेठ पोटनिवडणुकीत एक अ‍ॅक्सिडेंटल आमदार झाला. या अ‍ॅक्सिडेंटल आमदाराने कामे कमी व दंगेच जास्त केले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर केली.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ शनिपार चौकात आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर, जगदीश मुळीक, संजय सोनवणे, स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर पुण्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. प्रत्येक रस्त्यावर डबल डेकर रस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 54 हजार कोटी रुपये दिले. नदी प्रकल्प सुशोभीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. नदीपात्रात केवळ निर्मळ पाणी राहील, नदीत जाणारे सर्व पाणी सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यात येईल.

पुण्यासाठी आणखी एक विमानतळ देण्यात येणार आहे. पुण्यात नवीन एसआरए नियमावली करण्यात आली. जुने वाडे पुनर्विकासात करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शनिवारवाड्याच्या 100 मीटर परिसरामध्ये बांधकामांना परवानगी देण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्याचे काम आम्ही पुढील काळात करू, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले, हेमंत रासने यांनी महापालिकेत काम केल्याने विकास कसा करायचा, याची जाण त्यांना आहे. पोटनिवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नैराश्याने घरी न बसता रासने यांनी दुसर्‍या दिवसापासून जनतेत जाऊन काम सुरू केले.

हेमंत रासने म्हणाले, पोटनिवडणुकीनंतर मी प्रत्येक प्रभागात संपर्क कार्यालय सुरू करून मागील 18 महिन्यांत 50 हजार नागरिकांचे प्रश्न सोडविले आहेत. कसब्याने देशाला महान विभूती दिल्या असून, कचरामुक्त कसबा, वाहतूक कोंडीमुक्त कसबा आणि प्रदूषणमुक्त कसबा करण्याचे आपले लक्ष्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT