

नाशिक/ सिडको : सिडकोतील सावता नगर परिसरात मतदार स्लिप वाटप करण्याच्या बहाण्याने पैसे वाटप होत असल्याच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांचे समर्थक भिडले. त्यात दोन्ही गटातील दोघांना दुखापती झाल्या आहेत. या घटनेनंतर सिडकोत तणाव निर्माण झाला. दोन्ही गटातील समर्थकांनी हत्यारे, बंदुकीचा वापर केल्याचा आरोप-प्रत्यारोप झाला. मात्र, सीसीटीव्हीत हत्यारे आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपच्या वतीने सीमा हिरे व शिवसेना ठाकरे गटातर्फे सुधाकर बडगुजर निवडणूक लढवत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावता नगर येथील हनुमान मंदिराजवळ दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर आले. त्यातून वाद झाल्यानंतर हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील एक - एक कार्यकर्त्यास दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त सचिन बारी यांच्यासह अंबड, सातपूर, गुन्हे शाखेची पथके अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाली. तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पोलिस ठाण्यात येत कारवाईची मागणी केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनेची माहिती मिळताच नाशिक दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या नेत्या व आमदार पंकजा मुंडे यांनी अंबड पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पोलिस आयुक्त कर्णिक यांची भेट घेत दाेषींवर कारवाईची मागणी केली. एक महिला नाशिक पश्चिम मतदारसंघातून लढत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांना विजय बघवणार नसल्याचा दावा मुंडे यांनी केला. तसेच पोलिसांना चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
भाजप समर्थक : मतदार स्लिप वाटप करण्याच्या बहाण्याने पैसे वाटले. त्यांना अटकाव केला असता ४० ते ५० जणांच्या जमावाने हल्ला केला. जमावाने धारदार शस्त्रे, बंदुकीचा वापर केला. दमदाटी, शिवीगाळ केली.
शिवसेना ठाकरे गट समर्थक : कुरापत काढून जमावाने हल्ला केला. बंदुकीचा धाक दाखवला, तसेच बंदुकीच्या मुठीने डोक्यात मारून दुखापत केली. प्रचारापासून रोखले.
आमचे प्रतिनिधी प्रभाग २५ मध्ये लोकशाही पद्धतीने मतदार स्लिप वाटप करीत होते. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी शस्त्राने मारहाण केली. आमचे कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा संशय होता तर भाजपने पोलिसांकडे तक्रार करायची होती. महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्क वातावरण बिघडवले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून योग्य कारवाई करावी.
- सुधाकर बडगुजर, शिवसेना ठाकरे गट, उमेदवार नाशिक पश्चिम
मारहाणीचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. महिला उमेदवाराच्या विरोधात जाणीवपूर्वक हा प्रकार केला. पैसे वाटप करणे गैर आहे. संशयितांवर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले आहे.
- सीमा हिरे, भाजप, उमेदवार नाशिक पश्चिम
प्रचारासाठी नवी मुंबईतून गुन्हेगार नाशिकमध्ये आणले आहेत. आमच्या कार्यकर्त्यावर चाकूने वार केला. माझ्यावरही बंदूक रोखली. आमच्यापैकी एकाला बंदुकीने मारले.
मुकेश शहाणे, माजी नगरसेवक, भाजप
दोन गटात झालेल्या हाणामारीसंदर्भात सीसीटीव्ही तपासून गुन्हे दाखल करीत संशयितांचा शोध सुरू आहे. नेमका वाद कोणत्या कारणातून झाला, त्याचा तपास सुरू आहे. एका संशयिताला ताब्यात घेतले असून, दोन्ही गटांच्या तक्रारींनुसार गुन्हे दाखल होणार आहेत. परिसरात अतिरीक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २
घटना घडल्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात जमाव जमा झाला होता. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अतिरीक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला. त्यात आयटीपीबी, सीमा सुरक्षा बल, गुजरातमधील राखीव पोलिस दल तैनात होते.
-------------------------