पुणे: अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेला पुढील आठवड्यात सुरुवात होईल. त्यासाठीचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरमधील बदलामुळे यंदा विद्यार्थ्यांना फार थोडी माहिती भरावी लागणार असल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या 15 मेपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू करण्यात येणार असून, राज्यस्तरावर प्रवेश प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने राबवायची याचा शासन निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार संपूर्ण राज्यात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेली काही वर्षे सहा महापालिका क्षेत्रांमध्ये राबवण्यात येणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. संबंधित प्रक्रिया 1 एप्रिलपासूनच सुरू करण्यासंदर्भात सांगण्यात आले होते. परंतु, संबंधित प्रक्रिया काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे.
गेली काही वर्षे मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआरडीए), पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका क्षेत्रात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेची उपयोगिता लक्षात घेऊन संबंधित प्रवेश प्रक्रिया राज्यभर राबवण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक स्तरावरून करण्यात येईल, तर शिक्षण आयुक्तांचे प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण राहणार आहे.
पुणे, अहिल्यानगर, नाशिक या तिन्ही जिल्ह्यांची प्रवेश प्रक्रिया पूणे उपविभागीय संचालक स्तरावर राबविली जाणार आहे. अशाच प्रकारे राज्यातली इतर विभागांमध्ये विभागनिहाय उपसंचालक स्तरावरून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू करून एजन्सीची नियुक्ती देखील करण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
माहिती भरण्याची कटकट होणार कमी...
यंदा सरकारी पातळीवर वापरण्यात येत असलेल्या सर्व सिस्टीमचा डाटा इंटिग्रेड केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरताना जी माहिती द्यावी लागत होती, त्या माहितीच्या कटकटीपासून मुक्तता मिळणार आहे. तसेच, अगदी किरकोळ माहिती विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. त्यामुळे कमी कालावधीत अकरावीचा भाग एक आणि दहावीचा निकाल लागल्यानंतर भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार असल्याचे देखील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.