मंचर: काश्मीरमधील पहलगाम येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चार तास अगोदर निघाल्याने आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांतील 57 पर्यटक बचावले. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, असे पर्यटनासाठी गेलेले मंचर येथील शरद बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक किसन शिंदे यांनी सांगितले.
शरद बँकेचे मुख्य व्यवस्थापक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या तालुक्यांतील 57 पर्यटक जम्मू-काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्यामध्ये 7 लहान मुले, 28 पुरुष, 22 महिला असा एकूण 57 जणांचा समावेश होता. सर्व पर्यटक रविवारी (दि. 13) जम्मू-काश्मीर येथे फिरण्यासाठी निघाले होते. ते जम्मू तावी झेलम ट्रेनने गेले.
प्रथम श्रीनगर येथे मुक्काम करून ट्युलिप गार्डन, सोनमर्ग, गुलमर्ग ही ठिकाणे केल्यानंतर सर्व पर्यटक शनिवारी (दि. 19) पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी तेथील आरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदनवारी येथील साइड सीन पाहून त्या दिवशी तेथे मुक्काम केला आणि दुसर्या दिवशी रविवारी (दि. 20) ते वैष्णोदेवी दर्शनास निघाले. ते निघाल्यानंतर चार तासांतच मागे दहशतवाद्यांनी हल्ला करत 28 हिंदू बांधवांचा जीव घेतला.
वैष्णोदेवी दर्शनासाठी जात असताना श्रीनगर ते कटरा हायवे दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता. त्यामुळे या पर्यटकांनी मुघल रोड शोधला आणि जीव मुठीत धरून सर्व प्रवाशांनी 325 किलोमीटर अंतर पार करून वैष्णोदेवी गाठले. या रस्त्यावरून जाताना पाकिस्तान बॉर्डरने पूंछमार्गे, नंतर नागमार्गे 100 किलोमीटरपर्यंत बर्फाचा डोंगर, जंगल असल्याने या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, श्री भैरवनाथाच्या कृपेने व्यवस्थित दर्शन झाल्याचे किसन शिंदे यांनी सांगितले.
या ट्रिपमध्ये मुख्यत्वे आंबेगाव तालुक्यातील शरद सहकारी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक किरण शिंदे, बँकेचे शाखा व्यवस्थापक भरत तांबडे, माजी मुख्याध्यापक अंजाभाऊ तांबडे, शिरूर येथील मयूर फर्निचरचे मालक शंकर गायकवाड, जुन्नर येथील शिक्षक कुंडलिक नेटके, विकास दुराफे, खोडद येथील युनियन बँकेचे वरिष्ठ अधिकारी विलास गायकवाड, अर्जुन नवले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणारे मान्यवर, शेतकरीवर्ग सहभागी होते.