पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, पहिल्या प्रवेश फेरीअंतर्गत पुणे विभागाअंतर्गत एक लाख 16 हजार 291 जागांसाठी प्रवेश जाहीर केला आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी 10 हजार 835 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशाची गुणवत्तायादी अखेर शनिवारी सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 30 जून ते 7 जुलै या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. पुणे विभागाअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात 99 हजार 780 जागा उपलब्ध आहेत. (Latest Pune News)
त्यापैकी 29 हजार 568 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. पुण्यात दोन लाख 11 हजार सहा जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 62 हजार 812 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत. तर सोलापूरमध्ये 80 हजार 200 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 23 हजार 911 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्याच दिवशी पुणे जिल्ह्यात पाच हजार 497, सोलापूर जिल्ह्यात दोन हजार 988 आणि अहिल्यानगर जिल्ह्यात दोन हजार 350 अशा एकूण 10 हजार 835 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात 63 हजारांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश
अकरावी पहिल्या प्रवेश फेरीसाठी राज्यातील 10 लाख 66 हजार 5 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यात कला शाखेच्या 2 लाख 31 हजार 356 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 2 लाख 24 हजार 931 विद्यार्थ्यांचा आणि विज्ञान शाखेच्या 6 लाख 9 हजार 718 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकानुसार पहिल्या फेरीसाठी प्रवेश जाहीर केला आहे. त्यातील 63 हजार 466 विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे.