पुणे : पुढारी वृत्तसेवा : कात्रज – कोंढवा रस्त्यावर अपघातांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा रस्त्याची तात्पुूरती मलमपट्टी करण्याचे काम सुरू केले आहे. त्यातच भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून मिळणारे दोनशे कोटी रुपये अद्याप महापालिकेला न मिळाल्याने भूसंपादनाचे काम मार्गी लागलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर आणखी किती दिवस समस्यांचा सामना करावा लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. भूसंपादनामुळे अनेक वर्षे रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी ऑक्टोबरपूर्वी जागा ताब्यात घेऊन लगेच त्याचे काम सुरू करू, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले.
मात्र, राज्य सरकारकडून मंजूर झालेले 200 कोटी रुपये अद्याप महापालिकेच्या तिजोरीत जमा न झाल्याने भूसंपादन होत नाही. त्यात या रस्त्यावर अपघातांचे सत्र थांबत नाही. अपघातांमध्ये आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातांचे सत्र सुरू असल्याने पालिकेने वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार कात्रज-कोंढवा रस्त्यावर उपाययोना करण्यास सुरुवात केली आहे. ब्लिंकर्स, दिशादर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, उतारावर रम्बलर्स लावण्याचे काम पथ विभागांकडून हाती घेण्यात आले आहे. गोकूळनगर चौकात साइड पट्टे मारणे, शत्रुंजय मंदिर चौकात डांबरीकरण आणि नुकतेच दोन अपघात झालेल्या स्मशानभूमीजवळ खड्डे बुजविण्याचे व डांबरीकरण करण्याचे काम पथ विभागामार्फत करण्यात आले आहे.
मात्र, संपूर्ण खड्डे बुजविण्यासाठी किमान 1400 मेट्रिक टन डांबराची आवश्यकता असताना केवळ 400 मेट्रिक टन डांबर मिळाले आहे. पावसामुळे डांबर उपलब्ध नव्हते. आता पाऊस कमी झाला असून, दोन दिवसांपासून हे काम सुरू असल्याचे पथ विभागामार्फत सांगण्यात येत आहे. त्यातच डांबराच्या गाड्या सकाळी पाच वाजता मिळत असल्याने हे काम दुपारी दोन ते तीनपर्यंत चालते. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. तर, शत्रुंजय मंदिर चौक ते खडीमशीन चौकापर्यंत पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी झालेले खड्डे संबंधित विभागामार्फत बुजविलेले नाहीत. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. तात्पुरत्या उपायोजना करण्याऐवजी तातडीने भूसंपादन करत संपूर्ण रस्त्याचे काम मार्गी लावावे, ही स्थानिक नागरिकांची प्रमुख
मागणी आहे.
हेही वाचा :