आशिष देशमुख
पुणे : आठ दिवस शहराचे तापमान 39 अंशांवर स्थिर असून, चिंचवडचे तापमान 40 ते 42 अंशांवर गेल्याने शहर व परिसरात मार्चचा शेवटचा अन् एप्रिलचा पहिला आठवडा गेल्या दहा वर्षांत सर्वांत कडक उन्हाळा ठरला आहे.
यंदा मार्च महिन्यात सलग पंधरा दिवस शहराचे तापमान 37 अंशांवर आहे. या पंधरा दिवसांत सलग आठ दिवस शहराचे तापमान 39 अंशांवर होते. पाषाण, लोहगाव, चिंचवड, मगरपट्टा, लवळे येथील तापमान 40 ते 42 अंशावर गेले आहे. 2011 ते 2021 या दहा वर्षांतील मार्च व एप्रिलमधील तापमानाचा अंदाज घेतला असता शहराचे सर्वाधिक तापमान 28 मार्च 2015 रोजी 41.5 अंशावर गेल्याची नोंद आहे, तर 31 मार्च 1891 रोजी शहराचा पारा 42.8 अंशावर होता. हा कमाल तापमानाचा विक्रम गेल्या 121 वर्षांपासून आहे.
शहरात 1 मार्च ते 15 मार्च या कालावधीत किमान तापमान 34 ते 37 अंशांवर गेले. मात्र, 15 मार्चनंतर ते एकदम वाढून 38 ते 39 अंशांवर गेले. 16 ते 19 मार्च या कालावधीत पारा 38 ते 39.4 अंशांवर गेल्याने ही पहिली लाट म्हणून गणली गेली. त्यांनतरही शहराचा पारा 20 ते 27 मार्चपर्यंत 37 अंशांवर गेला. मात्र, 28 मार्च ते 4 एप्रिल या आठ दिवसांत शहराचे तापमान 39.5 ते 39.8 अंशांवर गेल्याने ही उष्णतेची दुसरी लाट गणली गेली.