राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : खेड तहसीलदार कार्यालयात विविध कामांनिमित्त येणार्या नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयात प्रवेश करताच बेशिस्त पार्किंगचा सामना करावा लागतो. त्यातच तेथे विविध प्रकारच्या कारवाईत जप्त करण्यात आलेली वाहने महिनोन् महिने उभी आहेत. या समस्येवर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खेड तहसील कार्यालयात तहसीलदार, तसेच महसूल संबंधित रेकॉर्ड विभाग, पुरवठा शाखा, दस्तनोंदणी कार्यालय, नागरी सुविधा केंद्र, निवडणूक कार्यालय, पोलिस कोठडी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आहे. येथे सकाळपासून अनेक वाहने लावलेली असतात. पार्किंगची जागा पूर्ण भरल्यानंतर विविध विभागांत कामानिमित्त येणार्या नागरिकांना आपली वाहने जागा मिळेल तिथे लावावी लागतात. दरम्यान, तहसील कार्यालयातील समस्यांबाबत तहसीलदार बेडसे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
समस्यांकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष
तहसील कार्यालय आवारात येणार्या नागरिकांना बसण्याची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वच्छतागृह असले तरी त्याची दैनंदिन साफसफाई केली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. तहसील कार्यालयात अनेक समस्या आहेत. त्याकडे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :