प्रा. अनिल धुमाळ
शिवनगर : शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत असताना शिक्षकांना दररोज ऑनलाइन माहिती तातडीने देण्याचा मेसेज येतो. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षकाची मोठी तारांबळ उडते. त्यामुळे शिक्षकांना कायम ऑनलाइन रहावे लागते. परिणामी शिकवण्याकडे दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांचा तोटा होतो. एकूणच शासनाच्या ऑनलाइन माहिती देण्याच्या या घाटातून शिक्षणाची वाट लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.(Latest Pune News)
शासनाच्या दबावामुळे शिकवण्याऐवजी शिक्षक कायम ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतले आहेत. यामध्ये अहवाल देणे, वेगवेगळे फॉर्म भरणे, विद्यार्थ्यांचा माहितीपूर्ण डेटा अपलोड करणे आदी कामांमुळे शिक्षकांना उसंत मिळत नाही. त्यातच केलेल्या कामाचे फोटो पाठवा म्हणजेच पुरावेही मागितले जातात. त्यामुळे शिक्षकांवर शासनाचा विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करायचा असतो. दुसरीकडे विविध दिन, वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती आदी कार्यक्रम साजऱ्या करण्याचे सातत्याने फतवे येतात. त्यातच ऑनलाइन माहितीही कमी वेळेत भरून मागितली जाते. यात मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धा, शासन स्तरावर वेगवेगळे राबवण्यात येणारे उपक्रम, सरकारी अहवालांची जबाबदारी, माहिती गोळा करणे व वरती पाठवणे आदी कामांचा समावेश होतो.
तसेच परिसरातील लोकसंख्या, तेथील भौतिक सुविधा, शिक्षणाबाहेरील मुलांची संख्या, त्या संबंधित असलेले उपक्रम आदी कामांचा भारही शिक्षकांवर लादला आहे. हे कमी की काय म्हणून सततच्या निवडणुका व त्या अनुषंगाने मतदारांची नोंदणी ते मतदान होईपर्यंत शिक्षकांना विविध जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. या कसरतीत शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे ऐवजी कार्यक्रमांची संख्या आणि माहिती देण्यातच शिक्षक अडकून पडत असल्याचे दिसून येते.
संबंधित शासकीय अधिकारी मोबाईलमधील वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळी माहिती मागवत असतात. मात्र पुढे जाऊन या माहितीचे होते काय हे मात्र न उलगडणारे कोडे असल्याचे शिक्षक सांगत आहेत.
शासन स्तरावर शिक्षकांना दररोज ऑनलाइन माहिती मागितली जाते. ती माहिती कायमच तातडीची व महत्त्वाची असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिक्षक सातत्याने मोबाईलमध्ये माहिती भरताना दिसतात. कधी मोबाईलला रेंज नसल्याने त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांचा शिक्षकांबद्दल गैरसमज होत आहे.