पुणे: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयांमधील पात्र शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण-२०२६साठी ऑनलाइन नावनोंदणीची प्रक्रिया बुधवारी (दि.९ सप्टेंबर) सुरू झाली आहे. शिक्षकांना १६ सप्टेंबरच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले आहेत.
दरवर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन जूनच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येते. मात्र, जनगणना - २०२७च्या पहिल्या टप्प्यात राज्यातील बहुतांश शिक्षकांची नियुक्ती झाल्याने यंदा जूनमध्ये प्रशिक्षण घेता आले नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण आता नोव्हेंबर २०२६ मध्ये दिवाळीच्या सुटीत आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी चार गट निश्चित
प्रशिक्षणासाठी चार गट निश्चित केले आहेत. त्यामध्ये प्राथमिक गट (इयत्ता १ली ते ४थी, ५वी, ७वी किंवा ८वीपर्यंत तसेच ६वी ते ८वी), माध्यमिक गट (९वी-१०वी), उच्च माध्यमिक गट (११वी-१२वी) आणि अध्यापक विद्यालय गट यांचा समावेश आहे. मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून नोंदणी करावी.
स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांनी नोंदणी करू नये
एप्रिल आणि मे २०२६मध्ये या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या पात्र शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. तसेच हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी लागू असून, विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांनी नोंदणी करू नये, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.