Pavitra Portal Teacher Recruitment Pudhari
पुणे

Maharashtra Teacher Recruitment: शिक्षक भरतीला ‘पवित्र’चा अडथळा; OTPच्या कटकटीने उमेदवार हैराण

३० हजारांहून अधिक पदांसाठी १.७० लाख उमेदवारांची धावपळ; प्राधान्यक्रम नोंदणीची मुदत १३ ऑगस्टपर्यंत, आणखी १५ दिवसांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील लाखो उमेदवारांचे लक्ष लागलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र संकेतस्थळावर तांत्रिक ताण आला आहे. काही उमेवारांना ओटीपी न येण्यासारख्या अडचणींमुळे उमेदवार हैराण झाले असून, उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठीची मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. परंतु संबंधित मुदतवाढ अपुरी असून, किमान पंधरा दिवस मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील पात्रताधारक उमेदवार शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. राज्यभरातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागांनुसार नुकत्याच ३० हजारांहून अधिक रिक्त जागांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये १३ हजार ३५१, नगरपालिका- नगरपरिषदांमध्ये २८०, महानगरपालिकांमध्ये १ हजार ९५४, आदिवासी विकास विभागाअंतर्गत २ हजार ४२१, शासकीय विद्यानिकेतनमध्ये ५६ खासगी शिक्षण संस्थांमध्ये १२ हजार १४८ पदे रिक्त आहे. या जागांसाठी स्वप्रमाणन पूर्ण असलेल्या १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

मुलाखतीसह, मुलाखतीविना या पर्यायांसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. पवित्र संकेतस्थळावर प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केल्यापासूनच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संकेतस्थळ सुरू न होणे, उमेदवाराला ओटीपी न मिळणे अशा समस्या येत आहेत. आठ-दहा तास प्रयत्न करूनही प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची माहिती काही पात्रताधारक उमेदवारांनी दिली. या अनुषंगाने संकेतस्थळावर ताण आल्याचे नमूद करून शिक्षण विभागाने रिक्त जागांसाठीचे प्राधान्यक्रम अंतिम करण्यासाठीची मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन प्राधान्यक्रम अंतिम करावेत, असे स्पष्ट केले आहे. परंतु, दिलेल्या मुदतीत प्राधान्यक्रम देण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

ओटीपीबाबत उमेदवारांना सूचना

प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी तसेच पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवार एकाच वेळी पोर्टलवर लॉगिन करीत असल्याने ओटीपी मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे ओटीपी मागवल्यानंतर तो येण्यासाठी काही वेळ प्रतीक्षा करावी. लगेच 'ओटीपी पुन्हा पाठवा'वर क्लिक करू नये. उशिराने आलेला ओटीपी देखील स्वीकारला जात असल्याने उमेदवारांनी घाई करू नये. दीर्घकाळ ओटीपी न मिळाल्यास 'रिसेंट' पर्यायाचा वापर करता येईल. तसेच, ओटीपीसंदर्भात अडचण कायम राहिल्यास वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्टरी आणि कॅशे साफ करा करून पुन्हा प्रयत्न करावा. त्यानंतरही समस्या कायम राहिल्यास गुप्त किंवा खासगी खिडकीमधून पोर्टलवर लॉगिन करण्याचे आवाहन केले आहे.

इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम उपलब्ध

आदिवासी विकास विभागाच्या उच्च माध्यमिक विभागातील विज्ञान शाखेतील जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसाठी इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना संबंधित विभागाच्या ८ ऑगस्टच्या पत्रानुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घेऊन वाढीव मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT