पुणे : येरवडा येथील श्री तारकेश्वर मंदिर पांडवकालीन आहे. पांडव अज्ञातवासात असताना येथे एक वर्ष राहिले होते. हे मंदिर तीन ते चार गावांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर एकाच दगडात कोरलेले आहे, हे मंदिराचे वैशिष्ट्ये आहे. (Pune News Update)
श्री तारकेश्वर मंदिर हे येरवडा भागात आहे. मंदिरात पायर्या चढून आल्यावर प्रथम कलशाचे दर्शन घेऊन भक्त आत प्रवेश करतात. प्रथम नंदीचे दर्शन घेऊन समोरील छोट्या दरवाजामधून मूळ गाभार्यात प्रवेश करतात आणि डाव्या बाजूला श्री काळभैरवनाथ व योगेश्वर मातेची मूर्ती आहे. यानंतर श्री गणपतीचे दर्शन घेऊन थोड्या उजव्या बाजूला गेले की स्वयंभू शिवलिंग दिसते. पिंडीसमोरच कोनाड्यात पार्वतीमातेची पंचधातूची मूर्ती आहे. पूर्वीच्या शिवलिंगाला आत्तापर्यंत दोनदा व—जलेप केला गेला आहे. शिवलिंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडताना श्रीराम, लक्ष्मण, सीता, मारुती या देवतांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. श्रीराम यांच्यासमोरच मारुतीची 4.5 फूट दक्षिणमुखी मूर्ती आहे. गणपतीसमोर कोनाड्यात शारदामातेची मूर्ती आहे. पूर्वी आत येण्यासाठी एकच दरवाजा होता, आता तीन दरवाजे आहेत.
नंदीच्या डाव्या बाजूला श्रीविठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती छोट्या मंदिरात आहे आणि उजव्या बाजूला शनीचे मंदिर आहे. नंदीमंडपातून उजव्या बाजूला विहीर आहे. या विहिरीला बाराही महिने पाणी असते. पुढे गेल्यावर श्रीराम, लक्ष्मण यांच्या जुन्या मूर्ती आहेत तसेच छोटे शिवलिंग, नंदी, नाग, नागीण आहेत. नागपंचमीला महिला येथे मूर्तीपूजा करायला येतात. येथून थोडे पुढे गेल्यावर रेणुकामातेची स्वयंभू मूर्ती आहे. ही देवी दक्षिणाभिमुख असून, नवसाला पावणारी आहे. येथून पुढे दोन पायर्या चढून आल्यावर श्री साईबाबा यांचे मंदिर आहे. त्यानंतर राधा-कृष्णाची संगमरवरी मूर्ती एका मंदिरात आहे. येथून खाली उतरल्यावर नंदीमंडपासमोर श्री दत्त मंदिर दिसते. येथील श्री काळभैरवनाथाचे मंदिर तीन गावांचे कुलदैवत आहे. येरवडा, संगमवाडी, निगडी येथून लोक नवरात्रोत्सवामध्ये दर्शनाला येतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. तीन दिवस उत्सव चालतो. दोन ते तीन लाख लोक दर्शनास येतात.
श्री तारकेश्वर मंदिराचे पुजारी संजय सदाशिव येरवडेकर म्हणाले, आम्ही येरवडेकर पुजारी पाच पिढ्यांपासून मंदिरातील देखभाल व पूजा-अर्चा करीत आहोत. हे मंदिर पांडवकालीन आहे. त्यामुळे भाविक बाहेरगावाहूनही दर्शनासाठी येतात. श्रावणातही मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते. विविध धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. हे जुने आणि ऐतिहासिक मंदिर आहे. येरवडा परिसरात चारशे फूट डोंगरात वसलेले तारकेश्वर मंदिर एका पाषाणात कोरण्यात आलेले आहे. 250 पायर्या चढून तसेच वाहनाने थेट मंदिराच्या पायरीपर्यंत जाता येते. पुण्यातील दोन स्वयंभू शिवलिंग असलेल्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.