निरा : पुरंदर तालुक्यातील निरा नजिक कोळेवस्ती येथील बकऱ्यांच्या वाडग्यावरुन पायी घरी जाणाऱ्या शेतकऱ्याला भरधाव टँकरने चिरडले. या भीषण अपघातात बबन कोंडीबा मोटे (वय ६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद मोटे यांचा मुलगा एकनाथ बबन मोटे यांनी जेजुरी पोलिसांत दिली आहे.
सोमवारी (दि. २९) रात्री साडेआठच्या सुमारास बबन मोटे त्यांच्या घराजवळ असणाऱ्या बकऱ्यांच्या वाडग्यावरुन पायी घरी जात होते. याच दरम्यान निरा मोरगाव मार्गावरुन भरधाव आलेल्या टँकरने (एमएच ०४ केएफ ३३४५) त्यांना धडक दिली.
मोटे यांच्या दोन्ही पायाला, दोन्ही हाताला व डोक्याला गंभीर दुखापत होवुन त्यांचा मृत्यू झाला. टॅकर चालक कल्पनाथ जगदेव यादव (वय ५०, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. घाटकोपर मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.