पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तळवडे येथील कारखान्यात शुक्रवारी (दि.8) झालेल्या दुर्घटनेत आगीत जळून मृत्यू पावलेल्या सहा महिला कामगारांवर निगडी स्मशानभूमी येथे सोमवारी (दि.11) सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे वातावरण गंभीर झाले होते. मृत्यांच्या नातेवाईकांचा टाहो ऐकून उपस्थितांचे डोळेतही पाणी येत होते. स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्या कारखान्यात शुक्रवारी दुपारी आग लागून स्फोट झाले.
त्यात तेथे काम करीत असलेल्या 16 कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील सहा जण वायसीएम रूग्णालयातच मरण पावल्या. त्यांची ओळख पटत नसल्याने मृतदेह व त्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वायसीएम रूग्णालयातील डेड हाऊसमधून मृतदेह नातेवाईकांकडे आज सकाळी सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यांची संख्या एकूण 9 वर पोहचली आहे. ओळख पटलेल्या सर्व सहा महिलांवर निगडी स्मशानस्मूती अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी सहा जणांना निरोप दिला जात असल्याने त्यांचे नातेवाईक व तळवडे परिसरातील नागरिकांनी स्मशानभूमीत गर्दी केली होती. नातेवाईकांचा अक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
अनेकांना अश्रू लपवता आले नाहीत. अंत्यविधीचा संपूर्ण खर्च महापालिकेकडून करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, फ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे व कर्मचारी आदी उपस्थित होते. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी एका महिला कामगारावर निगडी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. वायसीएम रूग्णालयात मरण पावलेल्या सहा जणांचे मृत्यू दाखले सोमवारी तातडीने बनवून घेण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांकडून पंचनामाही तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून मृत्यांना 5 लाखांचा निधी घोषित करण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे महापालिकेकडून तयार करून मृत्यांच्या नावेवाईकांकडे देण्यात येत आहेत. कागदपत्रांअभावी कोणताही अडसर निर्माण होणार नाही, याची खरबदारी घेण्यात येत आहे, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
रमा देवेंद्र आबदार (वया 29), राधा सयाजी गोधडे (17), कळमादेवी सूरज प्रजापती (62), मंगल बाबासाहेब खरबडे (वय 49), लता भारत धंगीकर (वय 38), पूनम अजय मिश्रा (वय 37).
तीन रुग्णांची प्रकृती गंभीर
तळवडे येथील आगीच्या घटनेतील जखमींवर ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, तीन जखमींची प्रकृती गंभीर आहे. जनरल वॉर्डमध्ये दाखल असलेल्या एका जखमीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. प्रकृती गंभीर असलेल्या तिन्ही जखमींवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. सर्व जखमींचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले. तळवडे येथे मेणबत्ती तयार करणार्या कंपनीला शुक्रवारी (8 डिसेंबर) आग लागली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना उपचारांसाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
दाखल केलेल्या दहा जखमींपैकी आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सात जखमींवर उपचार सुरू आहेत. तीन जखमी अतिदक्षता विभागात, तर चार रुग्ण सामान्य वॉर्डमध्ये दाखल आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे म्हणाले, 'सामान्य वॉर्डमध्ये दाखल असलेल्या एका जखमीच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. जखमींमध्ये काही रुग्णांच्या फुप्फुसांना इजा झाली असून, त्यांना अँटिबायोटिक व सपोर्टिव्ह केअर देणे सरू आहे.
हेही वाचा