Talwade Road Safety Pudhari
पुणे

Talwade Road Safety: तळवडे घाट रस्त्यावर अपघाताचा धोका

विहिरींमुळे जीवितहानीचा धोका; संरक्षण कठड्यांची ग्रामस्थांकडून मागणी

पुढारी वृत्तसेवा

कडूस: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये मोटार कोसळून सहा शाळकरी मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झालेली घटना ताजी आहे. अशाच प्रकारे खेड तालुक्यातील तळवडे (ता. खेड) येथील मुकाई मंदिराच्या जवळून जाणाऱ्या घाट उतारावर असणाऱ्या धोकादायक वळणावर शेजारी-शेजारी असणाऱ्या दोन विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या धोकादायक वळणावर वाहन वेगात आल्यास आणि चालकाला अंदाज न आल्यास रस्त्याच्या खाली जरी वाहन उतरले तर ते थेट विहिरीत जाण्याचा धोका आहे. तळवडे गावात जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता असून, या रस्त्याच्या अगदी बाजूला वळणावर कित्येक वर्षांपासून शेजारी-शेजारी वापरात असणाऱ्या दोन विहिरी आहे. या दोन विहिरी अगदी जमिनीबरोबर असून, त्यांची उंचीदेखील लहान आहे आणि याच दोन विहिरीच्या बाजूला लागून अजून एक विहिर आहे. मात्र, तिची उंची जरी असली तरी या विहिरीवर देखील जाळी मारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा या तीन विहिरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान या विहिरीच्या अगदी बाजूस गावात जाणारा रस्ता असून, या रस्त्याचे प्रशासनाच्या वतीने सिमेंट काँक्रीटचे काम करण्यात आले आहे; मात्र रस्त्याच्या बाजूला क्रिलीग अथवा संरक्षण भिंत बांधण्याची गरज असताना या प्रश्नाकडे प्रशासनाने कानाडोळा केला असल्याचा आरोप ग््राामस्थांनी केला आहे. या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घाट उतार वळणावर गावचे मुकाई मंदिर, दशक्रिया घाट, असल्याने रस्त्यावर सतत वहानांची वर्दळ असते.

वेगात वाहन असल्यास रस्त्याचा अंदाज न आल्यास वाहन थेट विहिरीत जाण्याचा धोका असून, या रस्त्याच्या बाजूला संरक्षण कठडे बांधण्याची मागणी होत आहे. याच रस्त्याच्या बाजूला अगदी जवळ गावचा पाझर तलाव असून, या पाझर तलावाची कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नसून हा पाझर तलावात अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने काही पाच ते सहा वर्षापूर्वी पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे ग््राामस्थांनी सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरच विहिरी असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला संरक्षण कठडे बांधण्यात येणार आहे.
वेणूबाई बोंबले, सरपंच, तळवडे
रस्त्याच्या अगदी जवळच तीन विहिरी असून, वाहन रस्त्याच्या खाली उतरले तर ते थेट विहिरीत जाण्याचा धोका आहे. रस्त्याचे सिमेट काँक्रीटीकरणाचे काम केले, तेव्हा धोका लक्षात घेऊन संरक्षण भिंत, कठडे किंवा विहिरीला जाळी बांधणे गरजेचे होते.
ॲड. रवींद्र वाळुंज, उपसरपंच, तळवडे
संरक्षण कठड्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. येथे लवकरच संरक्षण कठडे बांधण्यात येणार आहेत.
रवींद्र लोहकरे, ग््राामसेवक, तळवडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT