पुणे: मावळ भागातील औद्योगिक पट्टा असलेल्या तळेगाव परिसरात रेल्वेच्या पुणे विभागाकडून नवीन शेड (मालधक्का) उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या नवीन प्रकल्पामुळे पुणे विभागातील रेल्वे मालवाहतुकीचा वेग वाढणार असून व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक औद्योगिक कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तळेगाव आणि चाकण परिसरात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आणि इतर उद्योग आहेत. नवीन शेडमुळे या कंपन्यांना आपला कच्चा माल, पेट्रोलियम पदार्थ, साखर तसेच इतर वस्तू देशभरात पोहचविणे सोपे होणार आहे. परिणामी, पुणे परिसरातून होणाऱ्या मालाच्या आयात-निर्यातीला मोठी चालना मिळून रेल्वेच्या महसुलातही चांगली वाढ होईल.
13 जुन्या शेडचा होणार पुनर्विकास
नवीन शेड उभारण्यासोबतच पुणे विभागातील सध्या कार्यरत असलेल्या 13 जुन्या शेडचा पुनर्विकास करण्याचे कामही रेल्वेने हाती घेतले आहे. यामध्ये प्रामुख्याने सासवड रोड, चिंचवड, बारामती, फुरसुंगी, लोणी, गुरमार्केट (कोल्हापूर), सांगली, मिरज, सातारा, कराड, लोणंद, कोपरगाव आणि श्रीगोंदा या शेडचा समावेश आहे.
या पुनर्विकासामुळे जुन्या शेडची माल चढवण्याची आणि उतरवण्याची क्षमता वाढणार असून, मालगाड्यांचा प्रवास सुनिश्चित केला जाईल. मालवाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात वाढ करण्यासाठी स्वतंत्र मालगाड्यांचे नियोजन रेल्वे करीत आहे.
पुणे विभागातील मालवाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी आणि त्याला अधिक चालना देण्यासाठी मध्य रेल्वे पुणे विभागाकडून तळेगाव येथे नवीन शेड उभारण्याचे नियोजन सुरू आहे. या नवीन शेडमुळे पुणे विभागातील मालवाहतुकीला आणि पर्यायाने स्थानिक उद्योगांना आणखी गती मिळणार आहे. तसेच, विभागातील अन्य शेडच्या पुनर्विकासाचे देखील काम सुरू केले आहे.राजेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मध्य रेल्वे, पुणे विभाग