खेड: तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी या मार्गाच्या 54 किलोमीटर अंतरावर दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी राज्याने 59.75 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही मंजुरी दिली आहे. याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी माहिती दिली.
या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशन काळात आमदार बाबाजी काळे यांनी आमदार सचिन अहिर, सुनील शेळके आणि माऊली आबा कटके यांच्यासह विधानभवनाच्या पायऱ्यांवर लक्षवेधी आंदोलन केले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. या रस्त्याच्या कामामुळे औद्योगिक वाहतुकीला दिलासा मिळणार आहे. तसेच येथील अपघातांचा धोकाही कमी होण्यास मदत होणार आहे. (Latest Pune News)
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी नागपूर आणि मुंबई अधिवेशनात सातत्याने आवाज उठवला. 23 जुलै रोजी पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत चाकण येथे आढावा बैठक घेण्यात आली.
तसेच, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पीएमआरडीएच्या बैठकीतही या प्रश्नावर चर्चा झाली. त्यानंतर मुंबई मंत्रालयात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागांची बैठक घेण्यात आली. या सर्व प्रयत्नांनंतर आता 59.75 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या प्रकल्पांतर्गत तळेगाव ते चाकणदरम्यान चार पदरी उन्नत मार्ग आणि जमिनीवर समांतर चार पदरी रस्ता, तसेच चाकण ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी रस्त्याचे काम होणार आहे. हे संपूर्ण काम बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर केले जाणार आहे.
हा मार्ग पूर्वी राज्य रस्ते विकास आराखडा 2001 जी 21 अंतर्गत होता. त्यानंतर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याला राष्ट्रीय महामार्ग 548 डी चा दर्जा दिला. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तो महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.