तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे येथून धानोरेच्या दिशेने दुचाकीवरून जाणार्या इसमाला जुन्या वादातून तलवार व लोखंडी गजाने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. 5) घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तुषार दादा भोसुरे, प्रदीप बाळासाहेब भोसुरे व एका अनोळखी युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत सानिका संतोष चकोर (वय 19, रा. धानोरे, ता.शिरूर) यांनी फिर्याद दिली.
शिक्रापूर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धानोरे (ता. शिरूर) येथील संतोष चकोर यांचे गावातील दादासाहेब भोसुरे यांच्याशी पालखी सोहळ्यात किरकोळ वाद झाला होता. मात्र, नंतर तो वाद मिटला होता. बुधवारी संतोष चकोर हे मुलगी सानिकाच्या शालेय कामासाठी तळेगाव ढमढेरे येथील विद्यालयात आले होते.
शालेय कामकाज आटोपून सानिका चकोर व संतोष चकोर हे दोघे वेगवेगळ्या दुचाकीवरून धानोरे येथे घरी जात असताना अचानक तुषार भोसुरे, प्रदीप भोसुरे यांच्यासह एका अनोळखी युवकाने संतोष चकोर यांची दुचाकी रस्त्यावर पाडून संतोष यांना शिवीगाळ केली, तसेच दमदाटी करत 'तू आमच्या बापाच्या नादी लागतो का, तुझा आज शेवटच करतो' असे म्हणून संतोष यांच्यावर तलवार व लोखंडी गज व दगडाने हल्ला करत जबर जखमी केले. या वेळी संतोष चकोर यांच्या डोक्यात तलवार लागल्याने ते बेशुध्द होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले.
दरम्यान, मुलगी सानिका हिने आरडाओरड केल्याने आसपासचे लोक गोळा झाल्याने मारहाण करणारे सर्व हल्लेखोर पळून गेले. शिक्रापूर पोलिसांनी तुषार दादा भोसुरे, प्रदीप बाळासाहेब भोसुरे व एका अनोळखी युवक (सर्व रा. धानोरे, ता. शिरूर) यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रणजीत पठारे व पोलिस कर्मचारी अमोल नलगे हे या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा