पुणे

Ganeshotsav 2023 : बाजारात उकडीच्या मोदकांचा गोडवा; महिला व्यावसायिकांची लगबग

अमृता चौगुले

पुणे : बाप्पाच्या आगमनाचा दिवस म्हटल्यावर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य आलाच आणि हेच हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करण्याच्या तयारीला महिला व्यावसायिक लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसासाठी यंदा सुमारे दीड लाखाहून अधिक हातवळणीच्या उकडीच्या मोदकांसाठीची बुकिंग झाली असून, उत्सवात दहाही दिवस नैवेद्यासाठी, प्रसादासाठी व्यावसायिकांकडे मोदकांसाठी आतापासूनच विचारणा सुरू झाली आहे. सुमारे दीड हजार व्यावसायिक या वर्षी मोदकांच्या व्यवसायात उतरले असून, हातवळणीच्या उकडीच्या मोदकांना गणेश मंडळांसह घरगुती गणपतींसाठीही मोठी मागणी आहे.

गणेशोत्सवात हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करण्याचा व्यवसाय अनेक महिला करतात. काही जणी घरगुतीस्तरावर या व्यवसाय करतात, तर काहीजणी वर्षभर मोदक विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. महिला व्यावसायिक आपले कौशल्य वापरून हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करीत आहेत. उत्सवाला अवघे तीन ते चार दिवस उरले असून, पहिल्या दिवशी बाप्पाच्या आगमनानिमित्त प्रसादासाठी लागणार्‍या मोदकांसाठीची तयारी व्यावसायिकांनी आणि त्यांच्याकडील महिला कर्मचार्‍यांनी सुरू केली आहे.

मोदकांसाठीचे सारण सध्या तयार केले जात आहे. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले की, सोमवारी (दि. 18) मध्यरात्रीपासून हातवळणीचे उकडीचे मोदक तयार करण्यास व्यावसायिक सुरुवात करतील. त्यासाठीच्या सारणाची तयारी शनिवारपासून सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी खासकरून मोदकांना मागणी असते आणि यासाठी ऑर्डर व्यावसायिकांकडे नोंदविण्यात येत आहे. आम्हीसुद्धा 25 हजार मोदक तयार करणार आहोत.

हातळवणीचे उकडीचे मोदक तयार करणे हे कौशल्याचे काम आहे. मोदक हा उत्सवातील महत्त्वाचा भाग आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री हे मोदक तयार केले जातात आणि उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी अकरा वाजेपर्यंत ते घराघरांत आणि मंडळांच्या ठिकाणी पोहचविले जातात. यंदा मोदकांची किंमत 5 रुपयांनी वाढली असून, एका मोदकाची किंमत 30 ते 35 रुपये आहे.

गेल्या काही वर्षांपासून आम्ही मोदक विक्रीचा व्यवसाय करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदकांना मोठी मागणी असून, पहिल्या दिवसासाठी सुमारे दहा हजार मोदकांसाठीच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. 10 ते 15 कर्मचारी आमच्याकडे काम करीत आहेत.

– मंजू माने आणि संताजी माने, व्यावसायिक

मी गेल्या 15 वर्षांपासून मोदक विक्रीचा व्यवसाय करीत आहे. दरवर्षी उत्सवात मोदकांना चांगला प्रतिसाद असतो. यंदाही मोदकांसाठी विविध ठिकाणांहून ऑर्डर आल्या असून, मोदकांसाठीचे सारण तयार करण्याची तयारी सुरू आहे. पहिल्या दिवशी 1 हजार मोदक आम्ही तयार करणार आहोत. उत्सवाच्या दहाही दिवशी मोदकांसाठी ऑर्डर आल्या आहेत. हा व्यवसाय करताना खूप आनंद मिळतो.

– ज्योती ठाकूरदेसाई, व्यावसायिक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT