Sweet Potato Prices in Pune Market July 2025
पुणे: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रताळींची आवक सुरू झाली आहे. यंदा लवकर पाऊस सुरू झाल्याने राज्यात पिकाचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मीच आवक झाली आहे. मात्र, यंदा कर्नाटक, बेळगाव भागातून होणारी आवक दुप्पट झाली आहे. त्यामुळे रताळींचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. किरकोळ बाजारात 50 ते 100 रुपये भावाने रताळींची विक्री सुरू आहे. (Latest Pune News)
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगाव, वाशिंबासह इतर काही गावांतून आवक होत आहे. गेल्या वर्षी बाजारात सुमारे 5 हजार पोती आवक झाली होती. यंदा ती 2500 ते 2700 पोती आवक आहे. मात्र, कर्नाटकात जागेवरच रताळींना चांगला भाव मिळाल्याने गेल्या वर्षी तेथून आवक कमी झाली होती.
ती यंदा वाढली आहे. मागील वर्षी 2 हजार पोती आवक झालेल्या रताळींची यंदा 4 हजार पोती आवक झाली आहे. राज्यातून आवक होणारी रताळी गावरान आणि आकाराने लहान असतात. त्यांची चव गोड असते. त्यामुळे या रताळींना नागरिकांकडून मोठी मागणी असते, तर कर्नाटकातील रताळी आकाराने मोठी आणि चवीला तुरट असतात. त्यामुळे त्या रताळींना मागणी कमी असते, असे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.
रताळी घाऊक दर (प्रतिकिलो) किरकोळ दर (प्रतिकिलो)
गावरान 50 ते 60 रुपये 100 रुपये
कर्नाटक 25 ते 30 रुपये 50 ते 60 रुपये
नवरात्रोत्सवासह आषाढी एकादशी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र, कार्तिकी एकादशी या दिवशी बहुतांश लोक उपवास करीत असतात. त्यामुळे या काळात उपवासासाठी रताळींना जास्त मागणी असते. आता आषाढी एकादशीनिमित्त रताळींची आवक झाली आहे. त्यास चांगली मागणी आहे.- अमोल घुले, अडतदार, मार्केट यार्ड