पावसाने वाढविला ‘स्वीटकॉर्न’चा गोडवा; पर्यटनस्थळांसह घरगुती ग्राहकांकडून मक्याच्या कणसाला मागणी Pudhari
पुणे

Sweet Corn Season: पावसाने वाढविला ‘स्वीटकॉर्न’चा गोडवा; पर्यटनस्थळांसह घरगुती ग्राहकांकडून मक्याच्या कणसाला मागणी

आवक दुपटीने वाढली; किलोमागे पाच ते सात रुपयांची दरवाढ

पुढारी वृत्तसेवा

Sweet Corn Demand Rise

पुणे: शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने लावलेली हजेरी आणि मान्सून राज्याच्या वेशीवर येऊन पोहचल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात मक्याच्या कणसाला (स्वीटकॉर्न) मागणी वाढली आहे. त्याअनुषंगाने मागील चार ते पाच दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात कणसे दाखल होऊ लागली आहेत.

बाजारात येत असलेल्या मक्याच्या कणसाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने घाऊक बाजारात किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार प्रतिकिलोला 12 ते 18 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. (Latest Pune News)

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात जिल्ह्याच्या मंचर, चाकण, खेड, नारायणगाव आदी भागांसह अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यांतून आवक होत आहे. बाजारात दररोज एका पोत्यात 100 ते 120 नग असलेल्या 700 ते 800 पोत्यांची आवक आहे. मागील आठवड्यात हीच आवक 200 ते 300 पोती होत होती.

पावसाळी वातावरणामुळे सुटीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनासाठी पुणेकर घराबाहेर पडू लागले आहेत. या वेळी शहरात खडकवासल्यापासून ते सिंहगडापर्यंत मक्याच्या कणसाला आता चांगली पसंती मिळू लागली आहे.

लोहगड, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, कोकणसह शहरातील आणि उपनगरांतील किरकोळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी होत आहे. स्थानिक बाजारपेठेसह हैदराबाद आणि अहमदाबादसह गुजरात राज्यातील विविध भागांतूनही स्वीटकॉर्नला मागणी असल्याचे मक्याचे व्यापारी माऊली आंबेकर यांनी सांगितले.

पावसाने हजेरी लावताच स्वीटकॉर्नची आवक वाढली आहे. त्यापेक्षा मागणी जास्त आहे. त्यामुळे दहा दिवसांत स्वीटकॉर्नच्या भावात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत आवक आणि भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केट यार्ड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT