पुणे: जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका गावरान आंब्यांना बसला आहे. हंगाम सुरू होताच शंभर ते तीनशे रुपये डझनाने मिळणारा आंबा पाऊस सुरू होताच 60 ते 200 रुपयांवर आला आहे.
त्यात यंदा मान्सून दहा दिवस अगोदर येऊन राज्याच्या वेशीवर येऊन ठेपल्याची वर्दी मिळाल्याने बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र, पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने ग्राहकांसह खरेदीदारांनी आंब्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, आंब्याचे भाव मागील वीस वर्षांच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोहचले आहेत. (Latest Pune News)
गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात कोकणच्या रत्नागिरी आंब्याचा हंगाम आटोपण्यास सुरुवात होताच, पुणे विभागातून गावरान आंब्याची आवक सुरू होते. जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, कोकणातून माणगाव भागातून आवक होत आहे.
मे मध्यावधीपासून कच्च्यासह तयार हापूस, पायरी, केशर आणि बदाम आंबा बाजारात दाखल होतो. गोड, रसाळ आणि नैसर्गिकरीत्या पिकविलेला गावरान हापूस तसेच पायरी आंब्याच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. वटपौर्णिमेपर्यंत म्हणजेच जून मध्यावधीपर्यंत गावरान आंबा पुणेकरांकडून मोठ्या आवडीने खाल्ला जातो.
मागील आठवड्यात दररोज पाच ते दहा टन होणारी आवक सद्य:स्थितीत पंधरा ते सतरा टनांवर पोहचल्याची माहिती आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी दिली.
आंब्याच्या झाडाला पाड लागल्यानंतर आंबा सर्व उतरवून पिकण्यासाठी ठेवला आहे. सद्य:स्थितीत दररोज वीस किलोच्या 25 क्रेटमधून आंबा विक्रीसाठी घेऊन येत आहे. सुरुवातीला आंब्याला चांगला दर मिळाला. मात्र, अवकाळी पाऊस रोजच सुरू असल्याने आंब्याला अपेक्षित मागणी नाही.
- विलास पायगुडे, शेतकरी, मांडवी बुद्रुक, हवेली
दोन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होत असल्याने त्याचा फटका गावरान आंब्यालाही बसण्याची शक्यता आहे. मान्सूनने जोरदार हजेरी लावली, तर यंदा गावरान आंबाही लवकर आटोपणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
- यशवंत कोंडे, गावरान आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड