Pandit Sanjeev Abhyankar Swar Sanjeevan Pune Event
पुणे : वैष्णवांचा मेळा पंढरीकडे निघालाय अन् अवघा महाराष्ट्र भक्तिरंगात न्हाऊन गेलाय. आषाढीला पाऊले पंढरीकडे पोहचतील अन् विठुरायाची भेट घडेल. या वारीच्या अद्भुत सोहळ्यानिमित्त दैनिक ‘पुढारी’ आणि ‘पुढारी न्यूज’च्या वतीने 3 जुलै रोजी प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वरसंजीवन’ या संगीतमय भक्ती संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. यात पं. संजीव अभ्यंकर यांनी संगीतबद्ध केलेल्या संतरचना ऐकण्याची पर्वणी श्रोत्यांना मिळणार आहे. हा कार्यक्रम बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात रंगणार आहे.
आषाढी वारीनिमित्त ही संगीतमय संध्या आयोजित केली असून, पुनीत बालन ग्रुप हे कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी हे कार्यक्रमाचे फायनान्शिअल पार्टनर आहेत, तर बढेकर डेव्हलपर्स हे सहप्रायोजक आहेत. या कार्यक्रमात पंडित संजीव अभ्यंकर हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्यासह संत मीराबाई आणि शीख धर्माचे पहिले गुरू आणि संस्थापक श्री गुरू नानक देवजी यांच्या अभंगरचना सादर करणार आहेत. आषाढी वारीनिमित्त श्रोत्यांना पं. अभ्यंकर यांच्या सुरेल गायकीत रंगलेल्या भक्तिरचनांचा स्वरानंद यातून घेता येणार आहे. पं. अभ्यंकर हे मराठी अभंगांसह काही हिंदी संतरचनाही सादर करणार आहेत. यातील बहुसंख्य रचना पं. अभ्यंकर यांनी स्वत: संगीतबद्ध केल्या आहेत. काही रचना संगीतकार केदार पंडित यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.
पं. अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी (तबला), अभिषेक शिनकर (संवादिनी), प्रथमेश तरळकर (पखवाज), आदित्य आपटे (तालवाद्य) हे साथसंगत करणार आहेत. तर विलीना पात्रा, साईप्रसाद पांचाळ, मुक्ता जोशी आणि रुद्रप्रताप दुबे हे स्वरसाथ करणार आहेत.
कार्यक्रमाबद्दल बोलताना पं. अभ्यंकर म्हणाले, अभंगगायनाच्या माझ्या ‘समर्थवाणी’ आणि ‘एका जनार्दनी’ या पहिल्या दोन कॅसेट 1998 साली प्रसिद्ध झाल्या. त्याला संगीत केदार पंडित यांनी दिले होते. त्यानंतर अनेक अभंगरचनांच्या कॅसेट आल्या. काही काळानंतर मी स्वत:च्या रचनाही बांधायला सुरुवात केली आणि या रचनांचा समावेश माझ्या कार्यक्रमांमध्ये असतो. मी ‘स्वरसंजीवन’ कार्यक्रमात स्वत: संगीतबद्ध केलेल्या काही संतरचना सादर करणार आहे. या रचना मी विविध रागांमध्ये बांधलेल्या असून, दिवसातील सर्व प्रहरांमधल्या रागांवर आधारित या अभंगरचना आहेत. त्यामुळे या रचनांमध्ये वैविध्य आहे.
हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका शुक्रवारपासून (दि. 27 जून) उपलब्ध असतील.
1) दैनिक ‘पुढारी’ कार्यालय, मित्रमंडळ चौक, पाटील प्लाझासमोर, पर्वती - सकाळी 10 ते
सायंकाळी 5
2) ग्राहकपेठ, टिळक रस्ता - सकाळी 10 ते सायंकाळी 5
कार्यक्रम कधी : गुरुवारी, 3 जुलै
कुठे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी
वेळ :सायंकाळी 6 वाजता