पुणे: स्वारगेट ते कात्रज या दक्षिण पुण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिगत मेट्रोमार्गाचे काम आता प्रत्यक्ष जमिनीवर वेगाने सुरू झाले आहे. या मार्गावरील नियोजित भूमिगत स्थानकांसाठी आवश्यक असणारे ‘शाफ्ट’ (खड्डे) खोदण्याच्या कामाला सातारा रस्त्यावर प्रशासनाने सुरुवात केली आहे. मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ या गर्दीच्या परिसरात स्थानकांच्या उभारणीसाठी अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने हे खोदकाम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
या भूमिगत मेट्रोमार्गामुळे स्वारगेट आणि कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी कायमची फुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान, हे संपूर्ण काम डिसेंबर 2030 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
भूमिगत मेट्रो मार्गिका तयार करताना जमिनीखालील स्थानके तयार करणे हे मोठे तांत्रिक आव्हान असते. यासाठी सध्या मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ परिसरामध्ये अत्याधुनिक आणि हायटेक मशिनरी तैनात करण्यात आल्या आहेत.
या यंत्रांच्या साहाय्याने स्थानकांसाठी आवश्यक असणारे शाफ्ट खोदण्याचे काम सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने सुरू आहे. भरवस्तीच्या आणि वर्दळीच्या भागात काम होत असल्याने नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेत हे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वारगेट-कात्रज भूमिगत मेट्रोमार्गाचे काम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे. सध्या या मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांसाठी शाफ्ट खोदण्याचे काम अत्याधुनिक मशिनरीद्वारे अत्यंत वेगाने आणि सुरक्षिततेचे नियम पाळून सुरू करण्यात आले आहे. मार्केट यार्ड, बिबवेवाडी आणि भारती विद्यापीठ या भागांत प्रत्यक्ष कामाला गती मिळाली असून, आम्ही प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. पुणेकरांना जलद आणि दर्जेदार मेट्रो सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महा मेट्रो