पुणे: पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मेट्रोमार्गाच्या कामाला आता लवकरच आणखी वेग मिळणार आहे. या भुयारी मार्गाच्या खोदकामासाठी अत्यंत अत्याधुनिक असलेल्या दोन टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) आगामी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान पुण्यात दाखल होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष भुयारी खोदकामाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान, या मार्गावरील मेट्रोस्थानकांसाठी शाफ्ट खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, मार्केट यार्ड मेट्रोस्थानकासाठीचे खोदकाम सोमवारपासून सुरू झाली आहे. स्वारगेट ते कात्रज हा मार्ग संपूर्णपणे भुयारी असणार आहे.
या मार्गाच्या कामातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीखाली बोगदे तयार करणे. त्यासाठी लागणाऱ्या दोन अवाढव्य मशिन सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पुण्यात दाखल होतील. मशिन दाखल होताच त्या असेंबल करून प्रत्यक्ष भुयारी खोदकाम सुरू केले जाणार आहे.
खोदकाम आणि स्थानकांची कामे झाल्यावर पुणेकरांना स्वारगेटवरून थेट मेट्रोने कात्रजपर्यंत प्रवास करता येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा मोठा ताण कमी होणार आहे.
स्वारगेट ते कात्रज मेट्रोमार्गाच्या भुयारीकरणासाठी लागणाऱ्या दोन मशीन सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पुण्यात दाखल होत आहेत. उर्वरित दोन मशीन पुढील वर्षात दाखल होतील. भुयारी मार्गाच्या खोदकामासाठी एकूण चार टीबीएम लागणार आहेत. त्यापैकी दोन सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पुण्यात दाखल होत आहेत. या मशीन आल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण झाल्यावर खोदकामाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू केली जाईल.चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महामेट्रो