पुणे

स्वराज्य यात्रेमुळे सर्वसामान्यांना मिळणार ताकद; ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांचे मत

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्यांना व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकविण्यासाठी आम आदमी पक्षाची स्वराज्य यात्रा आहे. या यात्रेमुळे सर्वसामान्यांना ताकद मिळून त्यांची सत्ता येण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी केले. आजच्या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न हा संविधान आणि लोकशाही वाचविण्याचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आम आदमी पक्षाची पंढरपूर ते रायगड ही स्वराज्य यात्रा शनिवारी (दि. 3) पिंपरी-चिंचवड शहरात पोहोचली. त्या वेळी ते बोलत होते. पंढरपूर येथून 28 मे रोजी ही स्वराज्य यात्रा निघाली आहे. सांगवी शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत ही यात्रा पिंपरी-संत तुकारामनगर येथे आली. त्यानंतर येथे झालेल्या सभेत राचुरे बोलत होते.

आम आदमी पक्षाचे राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, पक्षाचे पदाधिकारी धनंजय शिंदे, देवेंद्र वानखेडे, विजय कुंभार, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, संतोष इंगळे, अमर डोंगरे, स्मिता पवार यासह राज्याच्या विविध क्षेत्रांतून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी पक्षाच्या विविध योजनांची माहिती देणारे पथनाट्यही सादर करण्यात आले.

किर्दत म्हणाले, 'शिक्षण आणि आरोग्यासाठी लागणार्‍या भरमसाठ खर्चामुळे गरिबांना या सुविधा मिळण्यात अडचणी येतात. त्यावर आम आदमी पार्टीने यशस्वी पर्याय शोधला आहे. दिल्लीतील सरकारी शाळेत आमदारांची मुले सर्वसामान्य मुलांसोबत शिकत आहेत. दिल्लीमध्ये उत्तम अशी आरोग्य सुविधांची सोय सर्वसामान्यांनाही उपलब्ध आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये उभे राहिलेले हे मॉडेल आपल्याला महाराष्ट्रातही उभे करायचे आहे. त्यासाठी पक्षाचे विचार समाजाच्या तळागाळात पोहोचविण्यासाठी ही यात्रा
काढली.'

हा खराखुरा आम आदमी

यात्रेचा रथ ज्या वेळी संत तुकारामनगर येथे पोहोचला, त्या वेळी एक उंची पुरी व्यक्ती तेथे असणार्‍या दुचाकी हलवत होती. त्यानंतर त्याने त्या जागेची स्वच्छता करण्यासाठी झाडू हातात घेतला. अतिशय साध्या वेशात असलेली व्यक्ती म्हणजे आपचे राज्याचे सह-प्रभारी गोपाल इटालिया होते. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष रुजविण्यात प्रमुख भूमिका असलेले इटालिया या सभेच्या वेळी व्यासपीठावर न जाता सर्वसामान्यांमध्ये बसून सभेच्या नियोजनात एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे राबत होते. 'हा खरा आम आदमी' या शब्दात नागरिकांनी इटालियांचे कौतुक केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT