पुणे

Swami Govind Dev Giri | ‘ज्ञानेश्वरी’बाबतच्या विधानावरून स्वामी गोविंद गिरी वादाच्या भोवऱ्यात

ज्ञानेश्वर संस्थान कमिटीकडन राष्ट्रीय परिषदेत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध

पुढारी वृत्तसेवा

आळंदी : तुषार झरेकर

स्वामी गोविंददेव गिरी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकाराम’ राष्ट्रीय परिषदेत केलेल्या वक्तव्याचा श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या ग्रंथांमध्ये वाङ्मय हे ग्रंथ नाहीत, ते भाष्य व संकलन आहेत, अशा आशयाचे विधान केल्याचा आरोप संस्थान कमिटीने केला आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथरचनेबाबत केलेले विधान अयोग्य

ज्ञानेश्वर संस्थान कमिटीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत व मराठी भाषेत साकारलेला ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ अत्यंत सहज, सुंदर, रसाळ व अलंकारिक भाषेत लिहिलेला असून तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचा महत्त्वाचा आधार आहे. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजावे यासाठी ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची निर्मिती केली, असेही निवेदनात नमूद केले आहे.‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाच्या उपसंहारात संत ज्ञानेश्वरांनी स्वतः ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले असून, “माझा आत्माराम बोली, माणसांमध्ये मिसे | वर्णिला शांतेशी तो हा ग्रंथु ||” अशा ओवीद्वारे ग्रंथाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथरचनेबाबत केलेले विधान अयोग्य असल्याचे संस्थान कमिटीने म्हटले आहे.

‘ज्ञानेश्वरी’ केवळ भाष्य नसून स्वतंत्र आणि प्रगल्भ ग्रंथरचना

संस्कृत गीतेमागील प्राकृत मराठी शब्द वाचले तर मराठी शब्द हे गीतेच्या वाणीचा अर्थ उलगडतात, असे संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’त नमूद केले आहे. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ केवळ भाष्य नसून स्वतंत्र आणि प्रगल्भ ग्रंथरचना असल्याचेही ज्ञानेश्वर संस्थानने स्पष्ट केले आहे.

स्वामी गोविंददेव गिरींनी वक्तव्य मागे घ्यावे आणि संतांची क्षमा मागावी

या पार्श्वभूमीवर स्वामी गोविंददेव गिरी यांनी केलेल्या विधानाशी संस्थान कमिटी असहमत असून त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्याचा व संत परंपरेचा आदर राखून संबंधितांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि संतांची क्षमा मागावी, अशी मागणीही कमिटीने केली आहे. संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, विश्वस्त अ‍ॅड. राजेंद्र बाबुराव उमाप, योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ, चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा), अ‍ॅड. रोहिणीताई पवार व पुरुषोत्तम मुरलीधर पाटील यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT