दौंड: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे सोमवारी (दि. 30 जून) पहाटे पंढरपूरकडे जाणार्या भाविकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. या वेळी एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या गंभीर घटनेमुळे केवळ दौंड तालुका नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर दोन दिवस उलटून गेले, तरीही आरोपींचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू असला, तरी ठोस प्रगती झालेली नाही. (Latest Pune News)
सुरुवातीला दौंड पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतर संबंधित मुलीने पोलिसांना दिलेल्या पुरवणी जबाबात केवळ झटापट झाल्याचे सांगितले, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात दौंड पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी यावर प्रतिक्रिया
देण्यास नकार दिला. तपासासाठी दहा पथके स्थापन करण्यात आली असून, विविध भागांत संशयितांचा शोध सुरू आहे. पीडितेला सुमारे 200 गुन्हेगारांचे फोटो दाखविण्यात आले आहेत. परंतु, अद्याप कोणत्याही संशयिताची ओळख पटलेली नाही. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, यावर अधिकृत माहिती देण्यास पोलिसांनी मौन बाळगले आहे.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांनी भेट देऊन तपास पथकांना आवश्यक मार्गदर्शन केले आहे. पोलिसांकडून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे. आरोपी लवकरच गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, या प्रकरणाचा योग्य तपास होऊन पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी जनतेतून मागणी होत आहे.
आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथके
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात लूटमार आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा गंभीर प्रकार उघडला होता. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची 10 विशेष पथके सक्रिय झाली आहेत. या घटनेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या एका आरोपीचे स्केच पोलिसांनी तयार केले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील पूर्वीचे सराईत गुन्हेगार आणि संशयित व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. आरोपींचा लवकरात लवकर माग काढून कठोर कारवाई केली जाईल, असा आशावाद पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे