पुणेः वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेला पुणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी पुणे पोलिसांना खोटी माहिती असलेला वास्तव्याचा पुरावा सादर करून परवाना मिळवल्याप्रकरणात पुण्यातील कोथरूड आणि वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात वैष्णवी हगवणेचा पती शशांक आणि दीर सुशील हगवणे यांचेविरोधात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर हगवणे बंधूंविरोधात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे.
हगवणे बंधूंनी शस्त्र परवाने मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत खोटी माहिती दिली होती. खोट्या माहितीच्या आधारे त्यांनी शस्त्र परवाना मिळविला होता. शस्त्र परवाना मिळवताना दोघांनी दिलेल्या माहितीत विसंगती असल्याचे चौकशीत उघड झाले. (Latest Pune News)
त्यांनी पुणे येथील कोथरूड व वारजे या भागात भाड्याने राहात असल्याची कागदपत्रे सादर केली होती. काहीच महिने येथे राहात असताना त्यांनी अशा पध्दतीने रहिवासी असल्याचे दाखवले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी दोन भावावर स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते.
आज न्यायालयात हजर करणार
सुशांत हगवणे याचा येरवडा कारागृहातून ताबा घेऊन त्याला सायंकाळी अटक करण्यात आली आहे. त्याला फसवणूक प्रकरणात आज (सोमवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती कोथरूड पोलिसांनी दिली.
परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
पती शशांक, दीर सुशील, तसेच नीलेश चव्हाण यांनी 2022 मध्ये पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळविले होते. तिघांचे पिस्तूल जप्त केले असून, त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पती शशांक आणि मित्र नीलेशलाही अटक होणार
वैष्णवीचा पती शशांक याच्यावरही रहिवासी पत्ता दिल्यावरून स्वतंत्र गुन्हा नोंद आहे. त्याला या गुन्ह्यात मंगळवारी ताब्यात घेतले जाणार आहे. वारजे माळवाडी पोलिस त्याचा ताबा घेणार आहेत, तर हगवणे कुटुंबाचा जवळचा व मित्र म्हणून असलेला नीलेश चव्हाण याच्यावर बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाने धमकाविल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याचाही मंगळवारी ताबा घेतला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांनी दिली.