पुणे

Pimpri News : बचत गटांमार्फत दुकाने, गोदाम, हॉटेलचे सर्वेक्षण

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने, गोदाम, गॅरेज, बेकरी, हॉटेल, शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, मल्टिप्लेक्स अशा व्यावसायिक आस्थापनांमध्ये मालक व कामगार राहतात. तसेच, तेथे आग प्रतिबंधक यंत्रणा नसते. अशा आस्थापनांची महिला बचत गटांद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरात नोंद असलेल्या 75 हजार आणि नोंद नसलेल्या 15 हजार आस्थापना आहेत. सर्वेक्षणासाठी एक ते दीड महिना लागणार आहेत. एका आस्थापनेसाठी 45 रुपये महिला बचत गटास देण्यात येणार आहे.

पूर्णानगर, चिखली येथील एका हार्डवेअरच्या दुकानास लागलेल्या आगीत दुकानातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते चौघे दुकानातील पोटमाळ्यावरच राहण्यास होते. हा प्रकार 30 ऑगस्टला घटला होता. शहरात अशा दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील दुकाने, गोदाम, गॅरेज, बेकरी, हॉटेल, शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, मल्टिप्लेक्स अशा व इतर सर्व आस्थापनांचा सर्व्हे करण्यात येणार होता. आग प्रतिबंधक यंत्रणा नसलेल्या आणि आस्थापनेमध्येच धोकादायकरित्या राहणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची घोषणा केली होती. मात्र, सर्वेक्षण सुरू न केल्यानेबद्दल 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच, सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती.

त्याची दखल घेऊन अग्निशमन विभागाने त्याबाबत तातडीने पावले उलचण्यास करसंकलन विभागाची सहा लाख बिलांचे महिला बचत गटांनी घरोघरी जाऊन वाटप केले. तसेच, आवश्यक माहिती घेतली. त्याप्रमाणे महिला बचत गटांद्वारे शहरातील व्यावसायिक आस्थापनाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अग्निशमन विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने महिला बचत गटांना हे काम देण्यात आले आहे. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळाला सर्वेक्षण करून घेण्यासाठी एकूण खर्चाच्या 10 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.

तसेच, फॉक्सबेरी एजन्सी मोबाईल अ‍ॅप विकसित करून देणार आहे. त्या अ‍ॅपवर विविध प्रकारच्या 60 माहितीची नोंद महिला करणार आहेत. महिलांना सर्वेक्षणाबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यासाठी येणार्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली. दरम्यान, सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर एक धोरण तयार केले जाणार आहे. अग्निशमन यंत्रणा नसल्याने आणि आस्थापनेत असुरक्षितपणे राहत असल्यास त्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

विविध 60 प्रश्नांची माहिती घेतली जाणार

करसंकलन विभागाची सहा लाख बिले महिन्याभरात वाटपाचे काम महिला बचत गटांनी यशस्वीपणे केले आहे. त्यामुळे व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षणाचे काम त्यांनाच देण्यात येत आहे. त्याबाबत आतापर्यंत 4 ते 5 बैठका झाल्या आहेत. गटास एका मिळकतीसाठी 45 रुपये देण्यात येणार आहेत. सर्वेक्षणात मोबाईल अ‍ॅपवर विविध 60 प्रश्नांची माहिती भरली जाणार आहे. हे सर्वेक्षण एक ते दीड महिन्यात पूर्ण केले जाईल. त्या माहितीच्या आधारे दोषी आस्थापनांवर अग्निशमन विभाग कारवाई करणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

शहरातील आस्थापनाची स्थिती

शहरात नोंदणीकृत व्यावसायिक आस्थापना-75 हजार
अनोंदणीकृत व्यावसायिक आस्थापना-15 हजार
सर्वेक्षणासाठी महिला बचत गटांच्या सदस्या-250
सर्वेक्षणाचा कालावधी-30 ते 45 दिवस
एका मिळकतीसाठी महिलांना मिळणार-45 रुपये

हेही वाचा

SCROLL FOR NEXT