पुणे : महात्मा फुले वाड्याच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाचे सर्वेक्षण महापालिकेने जवळपास पूर्ण केले आहे. जमीन मोजणीसाठी निधीदेखील देण्यात आला आहे. जागा मालक आणि भाडेकरूंना किती नुकसानभरपाई द्यावी, याबाबत धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली. (Pune News Update)
बुधवारी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत महात्मा फुले वाडा विस्तारीकरण व लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या बाबत माहिती देतांना पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, “या विस्तारीकरणासाठी विशेष उपायुक्त नियुक्त करण्यात आले आहेत. स्मारकाच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण करण्यात आले आहे. या बाबतचा अहवाल पूर्ण झाल्यानंतर बाधित जागामालक व भाडेकरूंना नुकसानभरपाई कशी दिली द्यावी, या बाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या कामाबाबतही माहिती घेतली आणि प्रशासनाला मार्गदर्शन केले. या स्मारकाचे सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम ठरलेल्या मुदतीआधीच पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.