

Pune Station Renaming Controversy
पुणे : अतिशय विकृत पद्धतीची अशी टीका आहे. राजकारणात टीका केली जाते, पण ज्या पद्धतीने संस्कार विसरून ही टीका केली जात आहे, त्याबद्दल माझ्याकडे निषेध करण्यासाठी शब्द नाहीत, अशा शब्दांत भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची मागणी केल्यानंतर ठाकरे शिवसेनेने कुलकर्णी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत पोस्टर लावून टीका केली होती. यावर त्यांनी पलटवार केला आहे.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आमच्यावर आहेत. महिलांचा आदर करण्याची शिकवणी त्यांनी दिली आहे. तो आदर्श पण हे लोकं विसरले काय? असा मला प्रश्न पडलाय आहे. ज्यांनी ४२ लढाई लढल्या आणि एकही हरले नाहीत. त्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या नावाला विरोध केला जात आहे. इतिहासाला उजळणी मिळावी म्हणून आपण बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केलेली आहे.
ठाकरेंच्या नेत्यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुमचा काही तुमच्या कार्यकर्त्यांवर अंकुश आहे का ?, संविधानिक पदावर असलेल्या एका महिलेबद्दल असे पोस्टर कसे काय लावले जातात. तुम्ही हा विषय नेमका कुठे घेऊन जात आहात? काही विचार शिल्लक आहेत की नाही? महिलांचा अपमान करणाऱ्या अशा लोकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक व्हायला हवी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
खासदार कुलकर्णी यांनी नामांतराची मागणी केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात शहरातील विविध भागात पोस्टरबाजी करून टीका केली आहे. एका पोस्टरवर “कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा”, अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. हे पोस्टर शनिवारवाड्याजवळ लावण्यात आले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरुद्ध बदनामीकारक जाहीर मजकूर प्रदर्शित केल्याबद्दल महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्या वतीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यात असे म्हटले आहे की, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्याबद्दल समस्त महिलांमध्ये नितांत आदर आहे. त्या भविष्यात राजकारणात येऊ इच्छिणा-या महिलांसाठी एक प्रतिनिधिक उदाहरण आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका केल्याने हा समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. त्याबद्दल महाराष्ट्र महिला आघाडीकडून आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत. आमच्या तक्रारीची दखल महिला आयोगाने तातडीने घेऊन संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.