जेथे विरोध नाही तेथे विमानतळ करा: खा. सुप्रिया सुळे Pudhari
पुणे

Supriya Sule News: जेथे विरोध नाही तेथे विमानतळ करा: खा. सुप्रिया सुळे

ड्रोन सर्व्हेच्या भीतीने महिलेचा मृत्यू झाल्याने कुंभारवळण येथे शोकसभा

पुढारी वृत्तसेवा

सासवड: सात गावांत विमानतळ करायचे आहे. या सात गावांत 2 हजार 235 हेक्टर जमीन बागायती आहे. अटक केलेल्या सर्वांना तातडीने सोडण्यात यावे, या मागणीसाठी पोलिस अधीक्षकांची भेट घेणार आहे. याखेरीज ग्रामस्थ आणि शेतकरी यांची एकत्रित अशी कृती समिती स्थापन करून जेथे विरोध होणार नाही तेथे विमानतळ करावे, अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करावी. मी त्याचा पाठपुरावा करेन, असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

कुंभारवळण येथे ड्रोन सर्व्हेच्या भीतीने शनिवारी (दि. 3) कुंभारवळण गावातील महिलेचा मृत्यू झाला. याबाबत शोकसभा घेण्यात आली, त्या वेळी खा. सुप्रिया सुळे बोलत होते. या प्रसंगी कुंभारवळणच्या सरपंच मंजूषा गायकवाड, वनपुरीच्या सरपंच राजेश्री कुंभारकर, उदाचीवाडी सरपंच सविता मगर, पारगाव मेमाणेच्या सरपंच ज्योतीताई मेमाणे, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, एखतपूर-मुंजवडी येथील शीतल टिळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, शासनाने जनभावना लक्षात घेऊन संयम आणि संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. शासनाने बळाचा वापर करून जनहिताविरोधात काम केले आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी लढा देऊ, अशी आग्रही भूमिका मांडली. ग्रामस्थांनी त्यांच्या समस्या सुळे यांच्यापुढे मांडल्या. पोलिसांनी कशाप्रकारे दडपशाही केली. चुकीचे गुन्हे दाखल केले, याबाबत माहिती दिली. (Latest Pune News)

अनेक लोकांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर देखील रोष व्यक्त केला. विमानतळाबाबत तुमची नक्की भूमिका स्पष्ट करा, असे या वेळी सात गावांतील शेतकरी म्हणाले. त्यामुळे खा. सुळे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न लोकांकडून करण्यात आला.

परंतु, विमानतळाला माझा विरोध नाही; मात्र जागेला माझा विरोध असल्याचे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ज्या भागातील लोक जमीन द्यायला तयार असतील त्या भागात विमानतळ करावे. जिथे लोकांचा विरोध असेल त्या भागात लोकांवर बळजबरी केली जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केली.

‘माझी जमीन दाखवा, ती जमीन मी तुम्हाला देते’

एका शेतकर्‍याने पुरंदर तालुक्यात खा. सुप्रिया सुळे यांची जमीन आहे, असा आरोप केला. याबाबत त्याने थेट सुप्रिया सुळे यांना विचारणा केली. यानंतर खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी, शरद पवार, सदानंद सुळे किंवा प्रतिभा पवार यांची एक इंच जमीन देखील इथे नाही. कुणीही सातबारा दाखवा, ती जमीन त्याच्या नावे करून देते.

कोणीही कुठेही आमच्या जमिनी असल्याचे सांगतात. पण, ते खरे नाही. मी सरकारला टॅक्स भरते. त्यामुळे माझ्याकडे येणारे उत्पन्न एक नंबरचे आहे. आम्ही जमीन घेतली, तर ती आमच्या नावाने असेल. आमच्या नावाचा गैरवापर केला जातोय. अनेक ठिकाणी माझ्या जमिनी आहेत, असे सांगितले जाते. पण, ते खरे नाही, असे खा. सुळे म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सात गावांसमोर असताना एक भूमिका आणि पुणे, मुंबईला जाऊन वेगळी भूमिका मांडू नये. सरकारसमोर शेतकर्‍यांची स्पष्ट भूमिका ठामपणे मांडावी. आम्ही 2016 पासून संघर्ष करीत आहोत. खा. सुप्रिया सुळे यांनी आम्हाला शब्द दिला की, आम्ही तुमचे म्हणणे सरकारपुढे मांडू. ड्रोन सर्व्हेच्या भीतीने विमानतळविरोधातील आंदोलक वामन मेमाणे या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ते आमच्याबरोबर तीन दिवस उपोषणाला बसले होते. घरावर ड्रोन फिरू लागले, आपले काहीच राहणार नाही, या धक्क्याने ते आपल्यातून निघून गेले. आमचा विमानतळाला तीव्र विरोध आहे आणि राहणारच.
- सतीश कुंभारकर, विमानतळबाधित शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT