बारामती: सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री हव्यात, अशी अपेक्षा मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. २०२९ पर्यंत आम्ही त्यांच्यासोबतच असू.
बारामतीत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुळे म्हणाल्या, बारामतीच्या पोटनिवडणुकीत मतदान कराव अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची खूप इच्छा होती. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मतदानाला येता आले नाही.
उन्हाळा खूप असल्याने प्रवास करू नये असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.मुंबईतील भाजप मोर्चा प्रकरणी त्या म्हणाल्या, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
पण ते करत असताना सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांची गैरसोय केल्याने नागरिकांमध्ये संताप झाल्याचे पाहायला मिळत आहे. रस्ता अडवून आंदोलन करण्यावर त्यांनी आत्मचिंतन करावे.
आंदोलन करायच होते तर तिथे एक मैदान आहे, त्या ठिकाणी करता आले असते. आम्ही आंदोलने करतो तेव्हा आम्हाला जागा निश्चित करून दिली जाते, मग सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना दुसरा न्याय कसा असा सवाल त्यांनी केला.
आ. रोहित पवार यांना ईडीने क्लीन चीट दिल्याच्या विषयावर त्या म्हणाल्या 'सत्य परेशान हो सकता है पराजित नाही'. अजितदादांचे विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा म्हणून रोहितला दहा राज्यात फिरावे लागले.
अखेर कर्नाटक राज्यात एफआयआर नोंदला गेला. महाराष्ट्रात तो अखेरपर्यंत नोंदला गेलाच नाही. दादा सत्तेचा भाग असताना हे घडणे दुर्दैवी आहे. २०२९ ला मी उमेदवार असावा अशी जनतेची इच्छा असल्याची जय पवार म्हणाले होते, त्यावर याबाबत मला काही माहिती नाही, असे खासदार सुळे म्हणाल्या.