बारामती: येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळात यापूर्वी काम करणार्या खा. सुप्रिया सुळे यांना नव्याने जाहीर झालेल्या समितीतून वगळण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे आता अभ्यागत मंडळाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले आहे. बारामतीत यावरून पवार घराण्यातील अंतर्गत धुसफुस आणि राजकारण पुन्हा उफाळून आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली. 3 सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय घेतला. (Latest Pune News)
बारामतीतील अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी खा. सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांमध्ये ज्योती बल्लाळ, डॉ. कीर्ती पवार, डॉ. सचिन कोकणे, श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोफणे, बिरजू मांढरे, मिलिंद संगई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाच्या या अभ्यागत मंडळात खा. सुप्रिया सुळे कार्यरत होत्या. परंतु नव्या नियुक्तीत त्यांना स्थान देण्यात आलेले नाही.
बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारी संबंधी खा. सुप्रिया सुळे यांनी तेथे बैठकही घेतली होती. रुग्णांच्या प्रश्नात त्या सातत्याने लक्ष घालत होत्या. असे असताना त्यांना समितीतून डावलण्यात आल्याने बारामतीत चर्चेला उधाण आले आहे. ही समिती पुढील दोन वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे. खा. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीला राजकीय दृष्टीकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.