High Blood Pressure Pudhari
पुणे

Super Woman Syndrome Hypertension: ‘सुपर वुमन’ सिंड्रोममुळे महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढला

घर आणि नोकरीच्या तणावात स्वतःकडे दुर्लक्ष; डॉक्टरांकडून आरोग्य तपासणीचा महत्त्वाचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

पुणे: घर, नोकरी, कुटुंब, समाज अशा विविध पातळ्यांवर लढाई लढणाऱ्या महिलांमध्ये सध्या ‌‘सुपर वुमन‌’ सिंड्रोम पाहायला मिळत आहे. आपल्याला एकाच वेळी अनेक कामे करायची आहेत, या तणावाखाली वावरताना उच्च रक्तदाबाचा विळखा घट्ट होत असल्याचे लक्षातही येत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाबाशी लढण्यासाठी स्वतःची काळजी घेणे, ही चैनीची गोष्ट नसून गरज आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अनेक महिला व्यावसायिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा आणि घरातील भूमिका निभावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. दिवसाची सुरुवात घाईत होते आणि शेवट मानसिक थकव्यात. अशा सततच्या ‌‘हाय अलर्ट‌’ अवस्थेमुळे शरीरात कॉर्टिसोल आणि अँड्रेनालिनसारख्या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते, ज्याचा थेट परिणाम रक्तवाहिन्यांच्या लवचिकतेवर आणि रक्तदाबावर होतो.

सातत्यपूर्ण मानसिक ताण रक्तवाहिन्यांच्या आतील एंडोथेलियल लेअरवर परिणाम करतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यांची लवचिकता कमी होते आणि शरीर सतत ‌‘फाइट ऑर फ्लाइट‌’ मोडमध्ये राहते. परिणामी, हळूहळू उच्च रक्तदाब, हृदयाचे ठोके अनियमित होणे, हृदयविकार, स्ट्रोक किंवा किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. शरीराला दररोज छोट्या-छोट्या ‌‘मायक्रो-रिकव्हरी‌’ची गरज असते. दर 60-90 मिनिटांनी छोटा बेक घेणे, दोन मिनिटे संथ श्वसनक्रिया करणे, स्क्रीनपासून दूर राहणे, पुरेशी झोप घेणे, नियमित व्यायाम हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. अभिजित पळशीकर, संचालक, हृदयरोग विभाग, सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल
शहरी भागातील महिलांमध्ये करिअर, घरातील जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधताना निर्माण होणारा मानसिक ताण हा ‌‘सायलेंट किलर‌’ ठरत आहे. सततच्या तणावामुळे शरीरातील कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालाइन यांसारख्या हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो. या स्थितीला ‌‘स्ट्रेस-इंड्यूस्ड हायपरटेन्शन‌’ असे म्हटले जाते. त्यामुळे महिलांनी केवळ मिठाचे प्रमाण कमी करण्यावर भर न देता, मानसिक स्वास्थ्याचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. 30 वर्षांवरील महिलांनी वर्षातून किमान दोनदा रक्तदाब तपासणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून संभाव्य धोका वेळेत ओळखता येईल.
डॉ. कपिल झिरपे, न्यूरो-इंटेन्सिव्ह केअर युनिटप्रमुख, रुबी हॉल क्लिनिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT