चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळी याच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले. या वेळी सनीचे नातेवाईक उपस्थित होते Pudhari
पुणे

Sunny Fulmali Gold Medal Lohegaon: पालावरून सुवर्ण शिखराकडे! सनी फुलमाळीच्या जिद्दीला मंत्री चंद्रकांत पाटील यांचा हात

लोहगावातील पालावर राहून सुवर्णपदक जिंकलेल्या सनी फुलमाळीचं आयुष्य बदलणार — पाटील यांच्याकडून घर, शिक्षण आणि दरमहा 50 हजार रुपयांची मदत जाहीर

पुढारी वृत्तसेवा

पुणे : घरची परिस्थिती बिकट असूनही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर बहरिनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक कमावणाऱ्या सनी फुलमाळीचं आयुष्यच पालटलं आहे. लोहगावमधील पालावर राहून कुस्तीमध्ये सुवर्ण कामगिरी करणाऱ्या सनी फुलमाळीचे पालकत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आहे. लोकसहभागातून घर आणि सरावासाठी तालीम, शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत आणि स्वतःच्या पगारातून दरमहा 50 हजार रुपये देण्याची घोषणा पाटील यांनी केली.(Latest Pune News)

मंत्री पाटील यांनी सुवर्णपदक विजेत्या सनी फुलमाळी आणि त्याच्या कुटुंबाची लोहगावमधील पालावर जाऊन भेट घेत अभिनंदन करून त्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले.

सनीच्या कामगिरीचे कौतुक करताना मंत्री पाटील म्हणाले, सनीला लोकसहभागातून घर आणि कुस्तीच्या सरावासाठी तालीम बांधून देणार आहे. त्यासोबतच शिक्षणासाठीही सर्वतोपरी मदत करणार असून, माझ्या आणि पत्नीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाहासाठी दरमहा 50 हजार रुपये देणार असल्याची घोषणा पाटील यांनी या वेळी केली. तसेच, त्याने आपले शिक्षण पूर्ण करण्यासोबतच कुस्तीकडे लक्ष केंद्रित करावे आणि ॲालिम्पिक मध्येही सुवर्ण कामगिरी करावी, अशी इच्छा व्यक्त केली.

भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे स्वामी धनगर, शरद माकर, किशोर शिंदे, अरविंद देवकर यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधल्यामुळे सनी फुलमाळीचे कर्तृत्व आज सर्वांसमोर आलं आहे. त्याबद्दल भटके विमुक्त विकास परिषदेचे आभार मानतो व अशा सगळ्या विषयांमध्ये आम्ही संघटनेला सर्व प्रकारची मदत करू असे उद्गार मंत्री पाटील यांनी काढले.

शासकीय नोकरीसाठी पाठपुरावा करणार

आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करून पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यापूर्वीच निर्णय झालेला असून, राज्यभरातील असंख्य खेळाडूंना त्याचा लाभ झालेला आहे. मात्र सदर निर्णय हा 17 वर्षांवरील खेळाडूंना लागू आहे. त्यामुळे सनीच्या निमित्ताने 17 वर्षांखालील खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठ मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे ही मंत्री पाटील या वेळी स्पष्ट केले.

जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या बळावर सनीने मिळविलेले यश हे अतिशय कौतुकास्पद आहे. आज त्याने आपल्या कामगिरीने आई-वडिलांचं नाव काढलं आहे. डोक्यावर छप्पर नसतानाही पालावर राहून त्याने ही कामगिरी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT