काटेवाडी : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून, या पार्श्वभूमीवर काटेवाडी येथील निवासस्थानी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेत आपल्या नुकसानीची व्यथा मांडली. या भेटीत शेतकऱ्यांनी पिकांच्या झालेल्या हानीचे तपशीलवार वर्णन करत तातडीने मदतीची मागणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत त्यांना धीर दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.
दरम्यान, पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
अवकाळी पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काढणीस आलेल्या गहू, ज्वारी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारपिटीमुळे पिके जमिनीदोस्त झाली असून, आंब्याचा मोहर गळून पडल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. द्राक्षबागांनाही या पावसाचा फटका बसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, आधीच वाढत्या खर्चामुळे शेती अडचणीत असताना अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, नुकसानग्रस्त भागांचे त्वरीत पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर मदत दिली जाईल. तसेच मदत प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई होऊ नये, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असेही त्यांनी बजावले.
काटेवाडी येथील या बैठकीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, शासन लवकरच ठोस निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.