पुणे: महापालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना झुकते माप मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री व पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे ’सबका साथ सबका विकास’चे आवाहन करीत शहरातील कोणत्याही एका भागाला वा गटाला झुकते माप न देता सर्व प्रभागांना समान विकास निधी मिळावा, अशी मागणी केली आहे.
राज्यात भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास व शिवसेना हे तीनही पक्ष महायुती सरकार सत्तेत एकत्र आहेत. मात्र, मुंबई वगळता बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या तीनही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यामधील पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळविली. त्यामुळे महायुतीत एकत्र असून, महापालिकांमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग््रेासला विरोधी पक्षात बसावे लागले आहे.
त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना प्रत्येकी सात कोटींचा निधी देण्यात आला असून, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यावर आता स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी आणि मित्र पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निधीचे वाटप करणे आवश्यक आहे.
तसेच, पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन, रस्ते विकास यांसारख्या मूलभूत गरजा राजकीय सीमांपलीकडे असल्याचे स्पष्ट करीत ‘सबका साथ सबका विकास’ या ध्येयानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेास, तसेच सर्व नगरसेवक यांना त्यांच्या प्रभागासाठी समान निधी देण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत,’ अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेऊन महापालिका आयुक्तांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेबाबत पुन्हा पत्र
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे अनेक प्रभाग चुकीच्या पद्धतीने जोडले गेले आहेत. प्रामुख्याने वडगाव शेरी मतदारसंघात येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला प्रभाग क्र. 1 व 2 भौगोलिकदृष्ट्या जवळ असतानाही प्रभाग क्र. 6 हा लांबच्या अंतराचा प्रभाग जोडला आहे. याबाबतही उपमुख्यमंत्री पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या रचनेत दुरुस्तीची मागणी केली आहे. या विषयासंदर्भात त्यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.