पुणे

Sunetra Pawar DCM: अजितदादांच्या अस्थिविसर्जनापूर्वीच सत्तेसाठी हालचाली कशासाठी? तटकरे-पटेलांच्या 'घाई'मुळे पवार कुटुंबीय नाराज

सुनेत्रा पवार ठरणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार

पुढारी वृत्तसेवा

बारामती : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी या प्रक्रियेमुळे पवार कुटुंब प्रचंड नाराज असल्याचे समोर आले आहे. एकीकडे बारामतीत अजितदादांच्या अस्थिविसर्जनाचे धार्मिक विधी सुरू असतानाच, दुसरीकडे मुंबईत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी राजकीय बैठकांचा धडाका लावल्याने पवार कुटुंबात नाराजी असल्याचे समजते आहे.

विधी आटोपण्यापूर्वीच राजकीय 'लगबग'

पुणे आणि मुंबईतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मुंबईत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा कुटुंबातील सदस्य अस्थिविसर्जनाच्या दु:खात होते. ‘सगळ्या गोष्टी नियंत्रणात असताना एवढी घाई करायची काय गरज होती? किमान विधी तरी पूर्ण होऊ द्यायचे होते,’ असा सूर कुटुंबातील सदस्यांनी खासगी चर्चेत व्यक्त केल्याचे समजते आहे. विशेषतः टीव्ही आणि सोशल मीडियावर या बैठकीच्या बातम्या पाहून कुटुंबात नाराजी अधिक गडद झाल्याचीही चर्चा आहे.

कार्यकर्त्यांचाही सवाल: 'नेते अस्थिविसर्जनाला का आले नाहीत?'

केवळ कुटुंबच नाही, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. ‘‘अजितदादांनी ज्यांच्यासाठी आयुष्य वेचले, ते महत्त्वाचे नेते त्यांच्या अस्थिविसर्जनाच्या विधीला उपस्थित न राहता मुंबईत सत्तेची पदे वाटण्यात व्यस्त कसे?’’ असा सवाल कार्यकर्त्यांनी विचारला आहे.

सुनेत्रा पवार यांचा होकार आणि विलिनीकरणाचा पेच

राजकीय विश्लेषकांच्या मते, या सर्व घडामोडींचा अर्थ असा आहे की, अजित पवार गटाने आता स्वतंत्रपणे आपली वाटचाल निश्चित केली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षासोबतच्या विलिनीकरणाचा मुद्दा सध्या मागे पडल्याचे दिसत आहे. जर सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्र नेतृत्व स्वीकारले, तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता तूर्तास धूसर असल्याचे बोलले जात आहे.

दिल्लीची भूमिका आणि प्रफुल्ल पटेलांचे वर्चस्व

दिल्लीतील राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त असल्याने प्रफुल्ल पटेल सध्या सर्व सूत्रे आपल्या हातात घेत आहेत. विलिनीकरण झाल्यास शरद पवार गटातील नेत्यांचे महत्त्व वाढेल आणि आपले वजन कमी होईल, या भीतीने पटेल आणि तटकरे यांनी ही राजकीय प्रक्रिया वेगाने उरकल्याची चर्चा आहे.

उद्या सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठक

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर, उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाईल. ‘‘अजित पवार यांच्याकडे जी खाती होती ती राष्ट्रवादीकडेच राहावी आणि सुनेत्रा पवारांनी नेतृत्व करावे,’’ अशी मागणी आमदार करणार असल्याचे समजते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT