Sugar Workers Wage Hike Pudhari
पुणे

Sugar Workers Wage Hike: वेतनवाढीमुळे साखर कामगारांना मिळणार 419 कोटी

4 ऑक्टोबर 2021 या कराराच्या वेतनावर 10 टक्के वाढीचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा
  • नोकरीच्या कालावधीप्रमाणे जादा वेतनही मिळणार

  • 10 टक्के वेतनवाढ कराराचा कालावधी दिनांक 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2029 पर्यंत असणार

  • अकुशल ते निरीक्षक अशा 12 वेतनश्रेणीत कामगारांना 2,623 ते 2,773 रुपये वेतनवाढ

  • वेतनवाढीत धुलाई, घरभाडे, वैद्यकीय भत्त्याचा समावेश

पुणे: राज्यातील साखर कारखान्यांच्या कामगारांच्या वेतनात 1 एप्रिल 2024 पासून दहा टक्के दरवाढ देण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, या निर्णयाचा फायदा सहकारी व खासगी कारखान्यातील दीड लाख साखर कामगारांना होणार आहे. साखर कामगार हा साखर उद्योगाचा महत्त्वाचा घटक असून, या वेतनवाढ त्रिपक्षीय करारामुळे अंदाजे 419 कोटी रुपयांचा जादा बोजा कारखान्यांवर पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

बुधवारी (दि. 23) साखर संकुल येथे साखर कामगारांच्या प्रश्नांवर शासनाने गठित केलेल्या त्रिपक्षीय समितीची पाचवी बैठक राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निर्णयांची माहिती देताना समितीचे सदस्य जयप्रकाश दांडेगांवकर, प्रकाश आवाडे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, राऊ पाटील, आनंदराव वायकर व अन्य कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. करारानुसार अकुशल ते सुपरवायझर पदापर्यंतच्या कामगारांना सरासरी प्रति महिना 2 हजार 623 ते 2 हजार 773 रुपयांपर्यंत वेतनवाढीचा निर्णय खेळीमेळीत झाला.

साखर कामगार वेतनवाढीवर एकमत होत नसल्याने याप्रश्नी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा लवाद स्थापून ते देतील तो निर्णय घेण्याचे त्रिपक्षीय समितीत ठरले. त्यानुसार शरद पवार यांच्या सूचनेनुसार दहा टक्के वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे,’ व तो सर्वमान्य झाल्याचे पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच कामगार आयुक्त व त्रिपक्षीय समितीचे सचिव रविराज इळवे यांनी वेतनवाढ, सेवाशर्ती तसेच इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा होऊन सामंजस्य करारास या वेळी मान्यता दिल्याचे सांगितले.

साखर कामगारांच्या वेतनवाढीचा विषय अनेक दिवस रेंगाळला होता. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या लवादानुसार कामगारांच्या वेतनात 10 टक्के वाढीच्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत. साखर उद्योगाच्या अडचणीच्या काळात आणि कारखाने कमी दिवस चाललेले असताना त्रिपक्षीय करारात आम्हांला इतरही सेवा सुविधांमध्ये वाढ मिळाल्याने आभारी आहोत.
तात्यासाहेब काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT