Raju Shetti  Pudhari
पुणे

Raju Shetti: स्वाभिमानीने ऊस आंदोलनाची परिस्थिती निवळण्यास मदत करावी; राजु शेट्‌टी यांच्याकडे राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी

दुष्काळी स्थितीत रब्बीची पाणी आवर्तने बंद, ऊस वाळण्यास सुरुवात झाल्याचा मांडला मुद्दा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: केंद्र सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्‌टी यांनी 12 ऑक्‍टोंबरच्या संयुक्त बैठकीत केलेल्या तीनही मागण्या रास्त आणि वाजवी असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. राज्यात दुष्काळी स्थितीत सरकारने रब्बीची पाण्याची आवर्तने बंद केल्याने शेतातील उभा ऊस जलदगतीने वाळत असून वजनामध्ये घट वाढू लागली आहे.

त्यामुळे सध्या स्वाभिमानीच्या सुरु असलेल्या आंदोलनात या उद्योगाचे शेतकरीही भागिदार असल्याने त्यांचे अधिक नुकसान होवू नये आणि ऊस गाळप होण्यासाठी आंदोलनाची परिस्थिती निवळण्यास मदत करावी, अशी मागणी राज्य सहकारी साखर संघाने शेट्‍टी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत राज्य साखर महासंघाचे अध्यक्ष पी.आर पाटील आणि संघाचे संचालक तथा नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील या दोघांच्या संयुक्त सहीने हे पत्र शेट्‌टी यांना देण्यात आले आहे.

त्यामध्ये म्हटले आहे की, केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) क्विंटलला पाच हजार रुपये करणे, शेतकऱ्यांना किमान 500 रुपये प्रति टनाप्रमाणे शासनाने परस्पर अनुदान देणे, उसाच्या स्त्रोतापासून सी हेवीद्वारे तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरामध्ये वाढ देवून प्रति लिटरला 70 रुपये दर निश्चित करणे या शेट्‌टी यांनी केलेल्या मागण्या साखर कारखान्यांना सहाय्यभूत आणि एकूणच साखर उद्योग कोलमडण्यापासून वाचविण्यासाठी महत्वाच्या आहेत. त्यावर केंद्राने दि. 14 ऑक्‍टोबर रोजी नीती आयोगाचे माजी सदस्य प्रो. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केलेली आहे.

त्यानंतर स्वाभिमानीने कर्नाटक व महाराष्ट्रात आंदोलन हाती घेतले आहे. स्वाभिमानीशी संबंधित सर्व सदस्य शेतकरी हे सहकारी साखर कारखान्यांच्या मालकीत समभागाचे भागिदार आहेत. त्यामुळे सारासार विचार करुन ऊस गाळप होण्याच्यादृष्टिने आंदोलनाची परिस्थिती निवळण्यास मदत करावी, असेही त्यात म्हटले आहे.

''मला साखर संघाचे पत्र मिळाले आहे. राज्यात दुष्काळाच्या झळा असल्या तरी सर्वत्र उद्याच्या उद्या ऊस तुटला पाहिजे, अशी स्थिती नाही. साखर कारखाने बंद राहून उत्पादन थांबले तरच केंद्र सरकारवर दबाव येणार आहे. शिवाय कमी उताऱ्याचा ऊस तोडून साखर उत्पादन घटूननुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या संयुक्त बैठकीत साखरेबाबत मी केलेल्या मागण्या या उद्योगाच्या आणि ऊस उत्पादकांच्या हिताच्याच आहे. मात्र, ज्या भागात खरोखरच ऊस वाळायला लागला आहे, त्यावर एकत्र चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठक व्हायला हवी. त्याबाबत कारखान्यांनी साखर तयार करुन गोदामात ठेवावी आणि साखरेचा एकही कण विकला जाणार नाही, याची लेखी हमी राज्य साखर संघाने कारखान्यांच्यावतीने आम्हांला दयावी, अशी आमची मागणी आहे.
- राजु शेट्‌टी , अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT