किशोर बरकाले
पुणे: साखर आयुक्तालयातंर्गत कृषी विभागातून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संख्यावाढ करून ऊसविकास विभागाचे बळकटीकरण व पुनर्रचना करण्यासाठीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांसह कृषी आयुक्तालयासही पाठविला आहे. कृषी विभागाचे विविध पदावंर १०३ अधिकारी-कर्मचारी साखर विभागात घेण्यासाठीचा दिनांक ४ मार्च २०२६ मध्ये पाठविलेल्या या प्रस्तावावर सहकार व कृषी विभागाचा कोणताच संयुक्त निर्णय मंत्रालय स्तरावरून होऊ शकलेला नसल्याचे सांगण्यात आले.
साखर कारखान्यांना १५० दिवस पुरेल इतक्या उसाची उपलब्धता, उच्च उत्पादनक्षम व उच्च साखर उताऱ्यासाठीचे नवीन ऊस वाण, ठिंबक सिंचन व शाश्वत ऊसविकासाची प्रभावी अंमलबजावणी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापराच्या अंमलबजावणीसाठी साखर आयुक्तालय सध्या तरी वेटिंगवरच आहे.
राष्ट्रीय मोहिमांशी सुसंगत राहून राज्याने ‘’विकसित महाराष्ट्र २०४७’’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतलेली आहे. राज्यात सध्या १२ लाख हेक्टर ऊस क्षेत्र असून, १०८० लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून सरासरी ११ टक्के उताऱ्यानुसार १०० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन हाती येत आहे. राज्यात २०४७ मध्ये १४ लाख हेक्टर क्षेत्रातून सरासरी ऊस उत्पादन १९६० लाख मे.टन आणि १३ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १६५ लाख मे. टन साखर उत्पादन तयार करण्याचा संकल्प आहे.
साखरेची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी साखर उत्पादन वाढविणे आवश्यक असून, ऊस क्षेत्रवाढीऐवजी हेक्टरी उत्पादकता वाढविणे, साखर उतारा वाढविणे हा पर्याय आहे. सध्या सुरू असलेल्या कृषी विभागाच्या आकृतिबंधाच्या विषयात याकडे लक्ष देऊन नव्याने प्रस्तावानुसार अंतर्भाव होणार काय? अशी अपेक्षा साखर आयुक्तालयातील सूत्रांकडून वर्तविली.
कृषी विकासासाठी एक संचालकपद महत्त्वपूर्ण
साखर आयुक्तालयात सध्या कृषी संचालकपद दर्जाचा अधिकारी कार्यरत नाही. आयुक्तालयात सध्या अधीक्षक कृषी अधिकारी १, तंत्र अधिकारी वर्ग २ चे एक पद असून, विभागात तंत्र अधिकाऱ्यांची संख्या ५ मिळून एकूण ७ अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. प्रस्तावित सुधारित आकृतिबंधात एक कृषी संचालक (विकास)पदाचा समावेश नव्याने केला आहे. सहसंचालक विकाससाठी अधीक्षक कृषी अधिकारी (वरिष्ठ श्रेणी) दोन पदे, उपसंचालक विकासची आठ पदे, तंत्र अधिकारी वर्ग २ ची चार पदे, कृषी अधिकारी वर्ग २ ची ४१ पदे आणि तांत्रिक सहाय्यक किंवा सहाय्यक कृषी अधिकारी वर्ग ३ ची ४७ पदे मिळून १०३ पदांची मागणीही साखर आयुक्तांनी सहकारच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.