Asha Bhosle Pudhari
पुणे

Asha Bhosle: 22 मुलाखतींच्या आठवणींतून उलगडलेले आपुलकीचे ऋणानुबंध

सुधीर गाडगीळ यांनी आशाताईंसोबतच्या दीर्घ संवादांचा आणि त्यांच्या मनमोकळ्या व्यक्तिमत्त्वाचा भावस्पर्शी प्रवास उलगडला

पुढारी वृत्तसेवा

सुधीर गाडगीळ

ज्येष्ठ निवेदक

आशाताईंनी अकरा हजारांहून अधिक गाणी गायली. त्या गाण्यांबद्दल, चित्रपटांबद्दल भरभरून बोलायच्या. त्या हसतमुख जगायच्या. गाणं हेच त्यांचं जगणं होतं. त्यांचा उत्साह टिकून राहण्याचं कारण गाणं हेच होतं. आशाताईंच्या जाण्यानं मी कुटुंबातील एक व्यक्ती गमावली आहे.

मी 1978 पासून आशाताईंशी गप्पा मारतोय. वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि परदेशांतसुद्धा आशाताईंच्या मी जवळपास 22 सविस्तर मुलाखती घेतल्या आहेत. याशिवाय वृत्तपत्रांसाठी घेतलेल्या मुलाखती वेगळ्या. या मुलाखती घेत असताना त्यांची जी आपुलकी आणि आत्मीयता होती, ती मी कधीच विसरू शकत नाही.

1978 मध्ये मी पहिल्यांदा आशाताईंशी बोललो. त्यांचे नाव प्रचंड मोठे होते आणि त्यांचे रसिकांच्या मनावर इतके गारूड होते, की त्यांच्याशी कसे बोलायचे? असा प्रश्न पडायचा. पण, त्या खूप मनमोकळेपणाने बोलायच्या. माझा हात हातात घेत ‌‘चल रे गप्पा मारूया‌’ असे म्हणायच्या. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्याशी कायमचे ऋणानुबंध जुळले. गप्पा मारताना त्या गाणीही गुणगुणायच्या. त्यांना गाणे आवडायचेच; पण विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायलाही त्यांना आवडायचे.

आशाताईंचे मला जाणवलेले वेगळेपण म्हणजे त्या स्वत:ला कोणी श्रेष्ठ गायिका समजत नव्हत्या. त्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलायच्या. बोलता बोलता त्यांना जर थकवा आला तर माझ्या खांद्यावर डोके ठेवून डुलकीही घ्यायच्या, या आठवणीचे छायाचित्रही माझ्याकडे आहे. त्या गाणे गुणगुणायच्या आणि म्हणायच्या की, माझे कोणते गाणे तुला सर्वाधिक आवडते, तर मी त्यांना म्हणालो की, तुमची सर्वच गाणी मला आवडतात. तरीही ‌‘का रे दुरावा...‌’ ‌‘जिवलगा...‌’ ही माझी आवडती गाणी आहेत, असे मी त्यांना सांगितले.

आशाताईंचे मंगेशकर कुटुंबातील प्रत्येकाशी चांगले ऋणानुबंध होते. संगीत क्षेत्रातील त्या मोठ्या कलावंत होत्या. चार दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा ‌‘काय म्हणताय?‌’ असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, आता माझे वय 93 आहे. आता काय भरभरून बोलण्याचे दिवस नाहीत...‌’ बोलता बोलता त्यांनी मी घेतलेल्या त्यांच्या मुलाखती रेकॉर्डेड आहेत का? मला ते देशील का? मला त्या ऐकायच्या आहेत. त्या मुलाखती ऐकण्याची त्यांची इच्छा होती. आज त्यांच्या जाण्याने घरातीलच एक व्यक्ती गमावल्याची भावना आहे. गाण्यातील एक पर्वच संपले आहे.

आज माझ्याकडे शब्द नाहीत. कारण, मी माझ्या जवळची व्यक्ती गमावली आहे. त्यांची सातत्याने तुलना लतादीदींशी व्हायची. त्यांना लतादीदींबद्दल आदर होता. पण, त्यांना स्वत:चे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे, याचा अभिमानही होता. त्यांच्या जाण्याने मी कुटुंबातील एक व्यक्ती गमावली आहे. ‌‘आज का रे दुरावा... हे गाणे आठवतेय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT