प्रसाद जगताप
पुणे: कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात एक अत्यंत आनंददायी घटना घडली आहे. येथे दुर्मिळ ‘लेपर्ड कॅट’ या वन्यजीव प्रजातीचे यशस्वी प्रजनन झाले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये एका मादी ‘लेपर्ड कॅट’ने एका सुंदर पिल्लाला जन्म दिला आणि आता हे पिल्लू सहा ते सात महिन्यांचे झाले आहे.
विशेष म्हणजे, प्राणिसंग्रहालयात ‘लेपर्ड कॅट’चे प्रजनन होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे, यामुळे पुणे शहराने वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचे चित्र दिसत आहे. (Latest Pune News)
‘लेपर्ड कॅट’ नैसर्गिक अधिवासातही दिसणे दुर्मिळ
‘लेपर्ड कॅट’ ही एक लहान, निशाचर आणि सहसा लाजाळू वृत्तीची वन्य मांजर आहे. त्यांना नैसर्गिक अधिवासात पाहणेही दुर्मिळ असते. अशा परिस्थितीत, पुण्यातील प्राणी संग्रहालयात त्यांचे यशस्वी प्रजनन होणे, ही केवळ प्राणी संग्रहालय प्रशासनासाठीच नव्हे, तर सर्व
प्राणीप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बाब आहे. या लहानशा पिल्लाच्या आगमनाने प्राणी संग्रहालयातील वातावरण उत्साहाने भारले आहे. अधिकारी आणि कर्मचारी या पिल्लाची विशेष काळजी घेत आहेत आणि त्याला निरोगी वातावरणात वाढवण्याचा त्यांचा निर्धार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!
लहानग्या पिल्लाने वेधले सर्वांचे लक्ष.
पिल्लाला लवकरच पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे
या वन्यजीव प्रेमींना या सुंदर प्राण्याला जवळून पाहण्याची संधी मिळेल.
या यशामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे आणि वन्यजीव संवर्धनाच्या प्रयत्नांना एक नवी दिशा मिळाली आहे.
देशातील प्राणी संग्रहालयातील पहिलीच घटना.
संग्रहालयात पर्यटकांसाठी नुकत्याच आणलेल्या लेपर्ड कॅटमध्ये दोन नर आणि एका मादीचा समावेश.
ऑक्टोबर 2024 मध्ये मादीने एका गोंडस पिल्लाला जन्म दिला, जे आता सहा-सात महिन्यांचे आहे.
प्राणिसंग्रहालय प्रशासनाने या पिल्लाला विशेष जपत हातावर वाढवण्याची भावना व्यक्त केली.
‘लेपर्ड कॅट’चे आमच्या संग्रहालयात प्रजनन होणे हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. ही देशातील पहिलीच घटना असल्यामुळे याचे महत्त्व अधिक आहे. आम्ही काही महिन्यांपूर्वी दोन नर आणि एक मादी ‘लेपर्ड कॅट’ आणल्या होत्या आणि त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण तयार केले. आमच्या कर्मचार्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. या लहानशा पिल्लाला आम्ही आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपत आहोत. त्याला हातावर वाढवत आहोत.- डॉ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय