पुणे

Success Story! .. आणि सानिका बनली लाखाची मानकरी

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आई-वडील दोघेही सिक्युरिटी गार्ड. महापालिकेच्या फुगेवाडी माध्यमिक शाळा अंतर्गत येणार्‍या बोपखेल भाग शाळेत शिकणारी सानिका चौधरी हिने दहावीच्या परीक्षेत 91.40 टक्के गुण मिळविले आहे. बिकट परिस्थितीवर मात करत ती महापालिकेच्या एक लाख रुपयांच्या बक्षीसाची मानकरी ठरली आहे.

सानिका ही बोपखेल-रामनगर येथे राहते. तिचे वडील दिनेश हे कोरेगाव पार्क येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. तर, आई गीता या कल्याणीनगर येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत आहेत. सानिकाने दररोज तीन तास अभ्यास करून परीक्षेत चांगले यश मिळवले आहे.

याबाबत सानिका म्हणाली, मला गुण बघितल्यावर विश्वासच बसत नव्हता. मी शॉक झाले होते. मला 95 ते 96 टक्के गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्या मानाने कमी गुण मिळाले. दरम्यान, महापालिकेच्या 1 लाख रुपयांच्या बक्षिसाची मानकरी झाल्याचा आनंदच आहे. हे पैसे मला उच्च शिक्षणासाठी वापरता येतील. बारावीनंतर मला सैन्य अधिकारी बनायचे आहे.

शाळेचे मुख्याध्यापक आदिनाथ कराड म्हणाले, महापालिकेच्या फुगेवाडी माध्यमिक शाळाअंतर्गत 22 विद्यार्थी हे महापालिकेच्या एक लाख, 50 हजार आणि 25 हजार अशा विविध बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत. गतवर्षी शिक्षणाचा जल्लोष पर्व-2 मध्ये याच विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला होता.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT